अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त

Indurikar Maharaj apologize

शिर्डी : सम-विषम तिथीवरून मुलगा-मुलगीबाबत भाष्य करून वादात अडकलेल्या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबत एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती. इंदोरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

इंदोरीकर महाराजांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केलेली दिलगिरी…

रामकृष्ण हरी

“महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिलावर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरूपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून मी माझ्या २६ वर्षांच्या कीर्तनरूपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रूढी, परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरूपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!” अशी इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली.

इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन