इंदिरा गांधी करीम लालाच्या भेटीला जायच्या; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

Sanjay Raut-Indira Gandhi

पुणे : एकीकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. तर दुसरीकडे कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून या तिन्ही पक्षांत विसंगती निर्माण होत आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. इंदिरा गांधी करीम लालाच्या भेटीला जायच्या, असे वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईचे जुने अंडरवर्ल्ड पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे. एवढेच नाही तर त्याला दम दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी यावेळी केला. दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराचे संजय राऊत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी लोकमत समूहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. “रोज सकाळी सामना कुणी वाचला नाही तरी रोज टीव्हीवर सामना पाहायला मिळतोच, यापेक्षा जास्त भाग्य कुठलं?” असा टोला यावेळी संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला. “खलनायक हा समाजाचा भाग आहे. माझ्या आसपास खलनायक फिरत असतात, आम्ही त्यांना बघतो. आमच्या पक्षात कुणीही खलनायक नाही. पण संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी खलनायक आहे. ” असंही यावेळी ते म्हणाले.

“आज जे सरकार स्थापन झालं आहे त्याला कुणीही खिचडी म्हणत नाही. त्याला सरकार म्हणतात. कारण त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन शरद पवार करतात. ” असं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. “महाराष्ट्र सदैव काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष वाढले. निवडणुकीत दिल्लीने काँग्रेसवर जर लक्ष घातले असते तर आज संख्या वाढली असती. ” अशी शक्यता त्यांनी बोलावून दाखवली. “राज्यात सत्तेत आलेलं महाविकास आघाडीचं सरकार टेस्टट्यूब बेबी नाही, व्यवस्थित जन्माला घातलेलं बाळ आहे. भाजपावाले शब्द पाळणार नाहीत, त्याची मला खात्रीच होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं आहे असं राजकारण सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष हे काय पाकिस्तानी पक्ष आहेत का?” असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत – संजय राऊत