आहाराचे अपचन-अजीर्ण अनेक रोगांचे कारण

Apachan

जेवण केल्यानंतर पचनक्रिया शरीरात सुरू असते. आहाराचे पचन व्यवस्थित होणे शरीराच्या बलवृद्धीकरिता सर्व धातूंच्या  पोषणाकरिता तसेच शरीरात कोणत्याही पोषक तत्त्वांची कमतरता येऊ नये याकरिता आवश्यक आहे. आयुर्वेद (Ayurveda) शास्त्रात आहाराचे नियम, आहार कसा असावा, कसा घ्यावा या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामागचे मुख्य कारण हेच की आहाराचे योग्य पचन होणे. आहारातील विषमता हे अजीर्ण-अपचनाचे कारण आहे. हे अपचन अनेक रोगांचे मूळ कारण आहे. अजीर्ण नाही तर रोग पण होणार नाही. ग्लानी येणे, उत्साह नसणे, शरीर व पोट जड वाटणे, पोट साफ न होणे, चक्कर येणे ही लक्षणे अजीर्ण झाल्यास उत्पन्न होतात. बऱ्याच वेळा याचे परावर्तन तीव्र लक्षणांमध्ये होते.

अजीर्ण कशामुळे होते त्याची कारणे बघूया –

अधिक मात्रेत पाणी पिणे – अन्न पचण्याकरिता पाणी आवश्यक आहेच; परंतु अति मात्रेत  सतत पाणी पिणे व मुळीच पाणी न पिणे हे दोन्ही हानीकारक आहे. एकाच वेळी गटगट करून पाण्याची बाटली रिकामी करू नये. तहान लागल्यावर पेल्याने थोडे थोडे पाणी प्यावे जेणेकरून आहार पचनाला मदत होईल. पाचनशक्ती  ही एक अग्नीच  आहे. चुलीवरील खिचडीत  भरपूर प्रमाणात पाणी घातले की काय होईल? खिचडी शिजायला जास्त वेळ लागेल व गचका होऊन चवही चांगली लागणार नाही. त्यातील पौष्टिक तत्त्वही कमी होतील, बरोबर ना ? कुशल सुगरण खिचडीत गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी वाढवत जाते व पौष्टिक चवदार खिचडी तयार होते. हीच  प्रक्रिया आमाशयात होते. म्हणून पाण्याचे सेवन मुहुर्मुहु म्हणजेच अल्प मात्रेत थोडे थोडे पीत राहावे.

विषम आहार घेणे – अवेळी भूक नसताना, वेळ गेल्यावर, अति प्रमाणात – पोटास तड जाईल एवढे जेवणे. हे सर्व अजीर्ण होण्याची कारणे आहेत. याचा अनुभव अनेक वेळा येतो. आवडीचे असेल तर दोन घास जास्त जातात व नंतर पोट जड वाटते. मलमूत्र यांची संवेदना अडकविणे. झोपेची अनियमितता. या सर्व कारणांनी हलका आहार घेतला तरी पचत नाही.

याशिवाय आपली मानसिक स्थिती उदा. ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ, आहाराच्या पचनावर परिणाम करीत असते. अशा वेळी योग्य मात्रेतला पौष्टिक आहारदेखील योग्य प्रकारे पचत नाही. या कारणांनी पाचक रस कमी स्त्रवित होतात, पचन प्रक्रिया प्रभावित होते व अजीर्ण रोग अशा मानसिकरीत्या दीन असणाऱ्यांना होतो. Nervous dyspepsia नावाने जो व्याधी सांगितला आहे त्याचे वर्णन आपल्या आयुर्वेदशास्त्राने हजारो वर्षांपूर्वीच सांगितले आहे. यात सोनोग्राफी वा इतर रिपोर्टसमध्ये  काहीच बदल आढळत नाही.  तरीही मळमळ, पोट फुगणे, सतत ढेकर, मलबद्धता या तक्रारी असतात. रात्री जागरण, असमतल बिछाना हेदेखील अन्न पचन व्यवस्थित होऊ देत नाही. परिणामी अजीर्ण व्याधी होतो. अशी विविध कारणे अजीर्णाची आयुर्वेदात सांगितली आहेत. कोणत्याही व्याधीचे कारण शोधून त्याचा त्याग करणे हे आद्य व महत्त्वाचा चिकित्सा भाग आहे. त्यामुळे क्षुल्लक वाटणारा अजीर्ण रोग भविष्यात होणाऱ्या आजाराचे मूळ कारण असू शकते.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER