देशी दारुची वाहतूक करणारे ताब्यात

देशी दारु ताब्यात

औरंगाबाद : देशी-विदेशी दारुची वाहतूक करणा-या चालकांना पकडून स्थानिक गुन्हे शाखा आणि वाळुज पोलिसांनी लाखो रुपयांची दारु व वाहने जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेने १६ हजार ८०० रुपयांची देशी व विदेशी दारु पकडली. तर वाळुज पोलिसांनी ८५ हजार ९०४ रुपयांची दारु पकडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून वैजापुरच्या शनीदेवगाव मार्गे कारमधून (एमएच-१२-वायए-८९३१) देशी व विदेशी दारुची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी वैजापुरच्या शनीदेवगाव चौफुली येथे सापळा रचला. यावेळी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आलेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा देशी दारुचे दहा बॉक्स व विदेशी दारुच्या ४८ बाटल्या कारमध्ये आढळून आल्या. त्यावरुन पोलिसांनी चालक रोहीत बाबासाहेब ब्राम्हणे (२६, रा. मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, जमादार भालेराव, खरात, अपसनवाड, किरण गोरे व वाल्मिक निकम करत आहेत.

तर वाळुज पोलिसांनी हॉटेल दावत समोरुन जात असलेल्या पिकअप व्हॅनला (एमएच-१७-बीवाय-१५०३) अडविले. यावेळी व्हॅनमधून देशी दारुची ३५ बॉक्स जप्त करण्यात आले. हा तरुण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा रहिवासी आहे. तर त्याचा एक साथीदार पसार झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER