भैयाजी जोशींचे संकेत आणि युटींचा दिल्लीतील यूटर्न

uddhav modi bhaiiyaji
uddhav modi bhaiiyaji

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी शुक्रवारी नागपुरात एक जबरदस्त राजकीय विधान केले.देवेंद्र फडणवीस यांचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष नेते हे नामाभिधान अल्पजीवी ठरेल असे ते म्हणाले. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तब्बल एक तास बंदद्वार चर्चा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलतो की काय याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. भैय्याजी जोशी हे संघाचे क्रमांक दोनशे पदाधिकारी आहेत सरसंघचालक डॉक्टर म्हणून भागवत यांच्या नंतर त्यांचे संघ आणि संघ परिवारात स्थान आहे.ते सहसा राजकीय विधाने कधीही करत नाहीत. मात्र शुक्रवारी नागपुरातील संघ परिवाराशी संबंधित असलेल्या साधना सहकारी बँकेच्या एका समारंभात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबद्दल मोठे विधान केले.फडणवीस या समारंभाला उपस्थित होते. जोशी यांनी केलेले विधान हे एक प्रकारे फडणवीस यांच्यासाठी शुभेच्छा वा आशीर्वाद व शुभेच्छा आहेत अशी चर्चा लगेच सुरू झाली.

त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दिल्लीत गाठीभेटीचे सत्र सुरू होते. ते चार जणांना भेटले. त्यात तिघे भाजपचे दिग्गज नेते होते. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरे गृहमंत्री अमित शहा आणि तिसरे भाजपाचे लोहपुरुष माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही ते भेटले. पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलले आणि नंतर सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झाले. मात्र सोनिया गांधी यांच्याशी भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलण्याचे त्यांनी टाळले.

ज्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) सध्या देशात प्रचंड वातावरण तापले आहे. त्या कायद्याला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर उघड समर्थन दिले.या कायद्यामुळे देशातील कुठल्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही,हा कायदा शेजारील देशांमध्ये असलेल्या अल्पसंख्यांक व्यक्तींना देशाचे नागरिकत्व देण्यासाठी आहे.त्यामुळे या कायद्याबाबत कुठलीही अडचण नाही,अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी घेतली.एकीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांनी सीएएला प्रखर विरोध केला असताना ठाकरे यांनी मात्र समर्थनाची भूमिका घेतली. ठाकरे यांनी एक प्रकारे यू-टर्न घेतला. गेले काही दिवस मुंबईत आणि महाराष्ट्रात पत्रकारांशी बोलताना ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सीएएचे समर्थन करत होते पण ही त्यांची भूमिका राज ठाकरे यांचा प्रभाव वाढू लागल्यानंतरची आहे.त्यापूर्वी म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वीची ठाकरे, संजय राऊत यांची विधाने तपासून बघा. त्यासाठी अगदी सामना या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे तेव्हाचे अंक बघायला हरकत नाही. दिल्ली समोर झुकणार नाही,कुठल्याही परिस्थितीत हा कायदा लागू होऊ देणार नाही, हुकुमशाही चालणार नाही अशी भाषा त्यावेळी शिवसेनेचे सर्व नेते करीत होते.

आज मात्र ठाकरे सीएएचे समर्थन करीत आहेत. हे समर्थन करून त्यांनी एकप्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादीला डिवचले. पंतप्रधानांच्या भेटीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीला अंगावर घेण्याची त्यांची तयारी असल्याचे संकेत त्यांनी दिले.

याशिवाय गेल्याच आठवड्यात कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी एल्गार परिषदेचा रोल काय होता याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याऐवजी एनआयए मार्फतच चौकशी करण्याची भूमिका ठाकरे यांनी घेतली आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या एनआयएच्या चौकशीला पूर्ण पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनआयएकडे हा तपास घेऊ नये आणि एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी ठाम भूमिका घेतलेली होती.त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या लावल्या. आपण कितीही विरोध केला तरी सीएए लागू करणे हा संपूर्णपणे केंद्र सरकारचा अधिकार आहे आणि राज्यांना हा कायदा लागू करणे बंधनकारक आहे हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे आज ना उद्या केंद्रासमोर या कायद्याबाबत झुकावेच लागणार आहे हे ओळखून त्यांनी सीएएचे समर्थन केले असे मानले जाते. दुसरे कारण हे देखील आहे की राज ठाकरे यांनी सीएएचे उघड समर्थन करून हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी चालवली आहे.

हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दुरावू नये म्हणून सीएएला पाठिंबा दिल्याशिवाय उद्धव यांच्याकडे पर्याय उरलेला नव्हता.एल्गार परिषद प्रकरणी एनआयए चौकशीला ठाकरे यांनी मंजुरी दिली तत्पूर्वी दिल्लीतील एका बड्या व्यक्तीशी त्यांचे बोलणे झाले होते आणि त्या बड्या व्यक्तीने सांगितल्यानुसार ठाकरे यांनी ही मंजुरी दिली असे बोलले जाते. ती बडी व्यक्ती म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी होते असे म्हणतात. आज मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उद्धव यांनी सीएएला पूर्ण समर्थन दिले. यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता न करता उद्धव हिंदुत्वाच्या मार्गावर परत करू पाहत आहेत असे दिसते.

तुम्ही एनआयए चौकशीला मान्यता द्या,तुम्ही सीएएला पाठिंबा द्या, सरकार पडेल, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा पाठिंबा काढून घेतील याची चिंता करू नका असा आश्वासक शब्द उद्धव ठाकरे यांना दिल्लीहून देण्यात आला असावा असा तर्कदेखील दिला जात आहे. या पार्श्वभूमीवरच भैय्याजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काढलेल्या उदगाराकडे बघितले तर पुढील काही दिवसात प्रचंड राजकीय घडामोडी करतील असे दिसते.