उदयनराजे-रामराजे यांच्यात समेट झाल्याचे संकेत

उदयनराजे-रामराजे

सातारा :- काही दिवसांपूर्वी एकाच पक्षात असताना एकमेकांवर प्रखर टीका करणारे खासदार उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale) आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar) यांच्यात समेट झाल्याचे संकेत आहेत. शनिवारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर हे दोन्ही नेते गप्पा मारताना दिसले.

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेकदा उदयनराजेंच्या बाजूने दिलेला कौल रामराजेंना पसंत पडला नव्हता. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असो अथवा लोकसभेचे उमेदवारी, रामराजे यांचा उदयनराजेंना कायमच विरोध असायचा.

फलटणच्या राजकारणामध्ये रामराजे यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी असलेली उदयनराजेंची मैत्री सर्वश्रुत आहे. रणजीतसिंह यांच्या मैत्रीखातर फलटणमध्ये जाऊन रामराजेंना आव्हान देण्याचे काम अनेकदा उदयनराजेंनी केले आहे.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत देखील रामराजेंनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या भर पावसातील सभेत रामराजेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला. आता उदयनराजे भाजपामध्ये आहेत तर रामराजे राष्ट्रवादीतच!

शनिवारी दुपारी रामराजे शासकीय विश्रामगृहावर एका कक्षात बसले होते. त्याच वेळी उदयनराजे देखील आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला भेटण्यासाठी विश्रामगृहावर आले. रामराजे देखील विश्रामगृहावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट रामराजे यांना भेटायला गेले. दोघांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. कोरोना पासून काळजी घ्या, असा सल्ला एकमेकांना दिला.

दोघांनाही एकमेकांना भेटायचे होते; ठरवून हे दोन्ही नेते एकत्र आल्याची चर्चा आहे. ही भेट उदयनराजे आणि रामराजे यांच्या मैत्री परवाची नांदी ठरू शकता, असा तर्कदेखील राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER