१ जानेवारीपासून लोकल सुरू होण्याचे संकेत

Local Trains Mumbai

मुंबई : करोना (Corona) संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना ठाकरे सरकार नवीन वर्षात मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत संकेत दिलेत. ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणालेत, आता मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती बरीच पूर्वपदावर आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी लवकरच निर्णय होणार आहे. जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नाही असे मला वाटते.

कोरोनाच्या रुग्णांची घटती संख्या, रुग्ण बरं होण्याचे वाढते प्रमाण तसेच करोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. ३१ डिसेंबरनंतर नवीन वर्ष सुरु झाले की ट्रेन पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल, असे वडेट्टीवार म्हणालेत. .

लोकलमधील गर्दीवर नियंत्रण कसे ठेवणार याबाबत ते म्हणाले की, “करोना सध्या नियंत्रणात आहे. दिल्लीत थंडी आणि गर्दीमुळे करोनाचे रुग्ण अचानक वाढले आहेत. तशी परिस्थिती मुंबईत उद्भवू नये यासाठी पुढचे १५ दिवस नियोजन आणि चर्चा करू. मास्क न घालता कोणी ट्रेनमध्ये चढू नये, गर्दी कमी करण्यासाठी नियोजन, पोलीस तसेच इतर मनुष्यबळाची मदत या सगळ्या गोष्टींची चाचपणी पूर्ण झाली आहे. तयारी पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात एक तारखेपपासून लोकल सुरु करणे विचाराधीन आहे”.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER