पंकजा मुंडेंकडून शिवसेना प्रवेशाचे संकेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

Uddhav Thackeray-Pankja Munde

मुंबई : नुकताच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पारंपरिक असलेल्या परळी मतदार संघातून माजी मंत्री पंकजा मुंडे या पराभूत झाल्या. विशेष म्हणजे त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी रविवारी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. “पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे” असं पंकजा मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

एकीकडे ही फेसबुक पोस्ट केल्यानंतर आज पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र दिसून आलं आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी पंकजांच्या ट्विटर प्रोफाईलध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता त्यांच्या प्रोफाईलवर भाजपबाबत कोणताही उल्लेख नाही. ट्विटर अकाऊंटच्या कव्हरपेजला जनतेला नमस्कार करणारा पंकजांचा फोटो आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे.

पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने त्या भाजप सोडण्याची चर्चा

तसेच त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकून शिवसेना प्रवेशाबाबतचे संकेत दिले आहे. महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’ असे संकेत त्यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या १२ तारखेला पंकजा मुंडे शिवसेना प्रवेशाची घोषणा करतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.