भारताचा तिसऱ्याच दिवशी पराभव, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India Vs Australia 1st Test Day 3

भारताचा (India) अवघ्या 36 धावांतच धुव्वा उडवल्यावर ऑस्ट्रेलियाने (Australia) अपेक्षेप्रमाणे पहिला कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी जिंकला. विजयाचे 90 धावांचे लक्ष्य आॕस्ट्रेलियाने दोन गडी गमावून गाठले आणि आठ गड्यांनी विजय नोंदवला. यासह आॕस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली, शिवाय यासह नाणेफेक जिंकली की सामना जिंकण्याची विराट कोहलीची यशाची मालिका खंडीत केली. कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रेलियातर्फे सलामीविर मॕथ्थ्यू वेडने 33 व जो बर्नसने नाबाद 51 धावा केल्या. उमेश यादवला षटकार लगावून बर्नसने विजय साजरा करतानाच अर्धशतकही पूर्ण केले. लाबूशेन 6 धावांवर बाद झाला तर स्टिव्ह स्मिथ एका धावेवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन सामनावीर ठरला. त्याने पहिल्या डावात नाबाद 73 धावांची खेळी केली होती.

गोलंदाजांनी सामना जिंकून दिला असताना हा सामनाविराचा निर्णय आश्चर्य जनक होता. विशेषतः 8 धावात 5 बळी मिळवणारा जोश हेझेलवूड आणि 21 धावात 4 बळी मिळवणारा कमिन्स यांचे भारताला 36 धावांत गुंडाळण्यात मोठे योगदान होते. पहिल्या डावात मिशेल स्टार्कही प्रभावी ठरला होता.

या सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की पहिल्या डावाअखेर मिळालेल्या आघाडीचा आम्हाला फायदा उचलता आला नाही. आज अवघ्या तासाभरात होत्याचे नव्हते झाले. आम्ही आज लढावूपणा दाखवायला हवा होता. पहिल्या डावाप्रमाणेच त्यांची गोलंदाजी होती पण धावा करण्यावर आम्ही जोर दिल्याने अडचणीत आलो.

मोहम्मद शामीबद्दल आताच काही सांगता येणार नाही. तो हातसुध्दा उचलू शकत नाही. त्याच्या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे विराटने सांगितले.

टीम पेन म्हणाला की, दोन्ही संघांच्या गोलंदाजांकडे विकेट काढण्याची क्षमता असल्याचे मी आज सकाळीच बोललो होतो. पण एवढ्या झटपट ते विकेट काढतील याची कल्पना नव्हती. गोलंदाजी चांगली झाली पण फलंदाजी अपेक्षेनुसार नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER