भारताचा उपांत्य फेरीत धावांचा पाठलाग करताना आतापर्यंतचा रेकॉर्ड खराब

Team India

मँचेस्टर (आयसीसी वर्ल्ड कप-२०१९) :- भारत-न्यूझीलंड तब्बल ११ वर्षांनंतर उपांत्य फेरीत आमने सामने आले आहेत. ११ वर्षांपूर्वी भारताचा विजय झाला होता. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २११ धावांची मजल मारली आहे. या लढतीत पावसाने व्यत्यय आणल्याने खेळ थांबवावा लागला आहे. दरम्यान, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर उपांत्य लढतींमध्ये धावाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. आतापर्यंत तीन सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या सामन्याच्या चिंता वाढल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरी तांबडा-पांढऱ्याची इंग्लंडला क्रेझ

मागोवा घेतल्यास विश्वचषकाच्या चार उपांत्य लढतीत भारतीय संघावर आव्हानाचा पाठलाग करण्याची वेळ आली असून, त्यापैकी तीन वेळा भारतीय संघ पराभूत झाला आहे. केवळ १९८३ मध्ये भारताला उपांत्य फेरीत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे शक्य झाले होते. त्यामुळे न्यूझीलंडला फार मोठी मजल मारता आली नसली तरी भारतीय संघाच्या या रेकॉर्डमुळे क्रिकेटप्रेमींची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. तीन वेळा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तीनवेळा संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. १९८३, २००३, आणि २०११ च्या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीचे आव्हान पार करून अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.

यापैकी दोन उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला होता. तर १९८३ मध्ये आव्हानाचा पाठलाग करत भारताने विजय मिळवला होता. विश्वचषकात आतापर्यंत चार उपांत्य सामन्यात भारताला धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागला होता. पैकी १९८३ चा अपवाद वगळता इतर तीन वेळा भारताला पराभूत व्हावे लागले होते. १९८७, १९९६ आणि २०१५ च्या स्पर्धांमध्ये भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. या तिन्ही स्पर्धांमध्ये धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पराभव झाला होता. १९८७ च्या विश्वचषकात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य लढतीत इंग्लंडने दिलेल्या २५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ३५ धावांनी पराभव झाला होता.

ही बातमी पण वाचा : भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट; न्यूझीलंड ४६.१ षटकात २११/५

तर १९९६ च्या विश्वचषकात कोलकात्यामधील ईडन गार्डन येथे झालेल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८ बाद १२० अशी अवस्था झाल्यानंतर प्रेक्षकांनी दंगा केल्याने श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले होते. २०१५ च्या विश्वचषकातही भारतीय संघ दमदार खेळ करत उपांत्य फेरीत पोहोचला होता. दरम्यान, या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ९५ धावांनी पराभूत झाला होता.

यंदा किव्हीनी दिलेले आवाहन लहान असले तरी प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी भेदक आहे. यातच पावसाचा व्यतय यामुळे क्रिकेट रसिकांची चिंता अधिकच वाढली आहे.