भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

श्रीपती खंचनाळे

कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (Shripati Khanchnale) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी किताब मिळवला होता.

त्यांना कोल्हापुरातील (Kolhapur) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्रीपती खंचनाळे हे मुळचे सीमाभागातील एकसंबा या गावचे आहेत. ते कित्येक वर्षांपासुन कोल्हापुरात वास्तव्यास होते. यानंतर विविध कुस्ती स्पर्धेत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजवला. ते नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली आहेत.

हिंदुस्तानातील कुस्तीतील सर्वोच्च हिंदकेसरी पदाचा बहुमान स्पर्धाच्या पहिल्याच वर्षी खेचून आणणारे नामांकित पैलवान म्हणजे पैलवान श्रीपती खंचनाळे होय. १९५९ मध्ये राजधानी दिल्लीतील न्यू रेल्वे स्टेडीयममध्ये साखळी फेरीतील सर्व- कुस्त्या चितपट मारून खंचनाळे अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम फेरीत गाठ पडली रुस्तुम-ए-पंजाब पैलवान बत्तासिंग बरोबर. या कुस्तीला पंच होते गुरू हनुमानसिंग (सतपालचे गुरु). दोघेही पैलवान तुल्यबळ असल्याने काट्यावरची लढत होती. क्षण- क्षणाला कुस्तीचे पारडे कधी या बाजूला तर, कधी त्या बाजूला झुकत होतं. 28 मिनिटे होऊन गेली तरी, निर्णय लागत नव्हता. त्यामुळे पंचानी कुस्ती अनिर्णित घोषित केली. हिंदकेसरीपदाचे ते पहिलेच वर्ष असल्याने ती कुस्ती निकालीच करावी, असे खंचनाळेंचे मत पडले. त्यानंतर कुस्ती होऊन खंचनाळे यांनी बाजी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER