अपरिचीत खेळातील हे आहेत 10 भारतीय यशवंत

Satnam Singh - Jehan Daruvala

भारतात क्रिकेटचाच बोलबोला असला आणि त्याच्या झंझावातात इतर खेळ झाकोळले गेले असले तरी क्रिकेट सोडून इतर खेळांतही भारतीय खेळाडू अनंत अडचणींवर मात करत चमकत आहेत. त्यात पारंपरीक प्रचलीत खेळ जसे की हॉकी, बॕडमिंटन, बुध्दीबळ, टेनिस, नेमबाजी, बॉक्सिंग हे खेळ तर आहेतच पण मोटार रेसिंग, स्किईंग, सर्फिंग, रोईंग (नौकायन), डब्ल्यु डब्ल्यु ई अशा वेगळ्या खेळांचाही समावेश आहे.

अशा या फारशा प्रचलीत नसलेल्या खेळांमध्ये ज्या भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे त्यात जेहान दारुवाला, सतनाम सिंग, आदिती चौहान, रितू फोगाट, रिंकू सिंग, कविता देवी, टीम सिग्निफाय, इशिता मालविय, शिवा केशवन, दत्तू भोकनळ यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल.

1) जेहान दारुवाला (मोटार रेसिंग) (Jehan Daruvala- Motor racing)

मुंबईचा हा 22 वर्षीय पारशी मुलगा. अलीकडेच त्याने फाॕर्म्युला 2 रेसिंगमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. बहारीन ग्रँड प्रिक्समध्ये तो कार्लिन टीमसाठी खेळताना विजेता ठरला. मीक शुमाकरसारख्या रेसरवर त्याने बाजी मारली. त्याच्या आधीच्या रेसमध्ये तो तिसऱ्या आणि त्याच्या आधी चौथ्या स्थानी होता. फाॕर्म्युला टू रेसिंगचा त्याचा हा पहिलाच सिझन आणि फाॕर्म्युला दोन रेसचे विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला. यासह करुन चंढोक व नारायण कार्तिकेयन यांची परंपरा तो पुढे चालवतोय. मोटार रेसिंगमध्ये फाॕर्म्युला वन खालोखाल फाॕर्म्युला टू महत्त्वाची मानली जाते आणि त्याच्याखाली येणाऱ्या फार्म्युला थ्री मध्ये 2019 च्या सिझनमध्ये तो तिसरा होता. या यशानेच त्याला यंदा फाॕर्म्युला दोनमध्ये बढती मिळाली आहे आणि या सिझनमध्ये मोटार इंजिनच्या समस्या असतानाही त्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

2) सतनामसिंग (बास्केटबॉल) (Satnamsingh – Basketball)

तब्बल 7 फूट 2 इंच अशा ताडामाडाच्या उंचीचा सतनामसिंग भामरा हा व्यावसायिक बास्केटबाॕलपटू. बास्केटबाॕलची विश्वविख्यात लीग एनबीए मध्ये खेळणारा तो पहिलाच भारतीय वंशाचा खेळाडू. डलास मव्हेरिक्सने त्याला संधी दिली आणि त्यांचाच संघ टेक्सास लिजेंडस् साठी तो डी लीगमध्ये खेळला. कॕनडाच्या एनबीएलमध्ये खेळणाराही तो पहिलाच भारतीय वंशाचा बास्केटबाॕलपटू ठरला. काॕलेज बास्केटबाॕल न खेळता किंवा परदेशात व्यावसायिक लीग न खेळता किंवा एनबीए डेव्हलपमेंट लीगमध्ये न खेळता एनबीए या मानाच्या स्पर्धेत थेट खेळायची संधी मिळालेला तो 2005 नंतरचा पहिलाच बास्केटबाॕलपटू आहे.

3) आदिती चौहान (महिला फूटबॉल) (Aditi Chuhan- Football)

भारताच्या महिला फूटबॉल संघाची ही गोलकीपर. ती इंग्लिश लीगमध्ये खेळणारी पहिलीच भारतीय महिला फूटबॉलपटू ठरली. वेस्ट हॕम युनायटेड संघाने तिला संधी दिली. लोबरो विद्यापीठाच्या स्टुडंट एक्सचेंज कार्यक्रमामुळे तिला ही संधी मिळाली आणि आता इंग्लिश लीगमध्ये खेळून ती कितीतरी महिला फूटबॉलपटूंसाठी प्रेरणा ठरली आहे. एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये आशियातील सर्वोत्तम महिला फूटबॉलपटू हा सन्मान मिळविणारीसुध्दा ती पहिलीच भारतीय आहे. 2016 च्या साऊथ एशीयन गेम्स व 2012 च्या साऊथ एशीयन फूटबॉल फेडरेशनच्या वुमेन्स कप विजेत्या संघाच्या यशातही तिचे योगदान होते. दक्षिण कोरियात 2014 च्या आशियाडमध्येही ती खेळली आणि सध्या ती इंडियन वुमेन्स लीगमध्ये खेळते.

4) रिंकूसिंग (बेसबॉल व डब्ल्यु डब्लू ई) (Rinku singh- Baseball / WWE)

उत्तर प्रदेशची हा 30 वर्षीय खेळाडू ‘मिलीयन डॉलर आर्म’ पीचर म्हणून ओळखला जातो. तो अमेरिकेत प्रोफेशनल बेसबॉल खेळलेला पहिलाच भारतीय खेळाडू आहे. पिटसबर्ग पायरेटसने त्याला संघात स्थान दिले आहे आणि त्यांच्यासाठी तो बऱ्याच मायनर लीग खेळला आहे. मिलियन डॉलर आर्म स्पर्धेत तो विजेता आणि दिनेश पटेल उपविजेता ठरला होता आणि अमेरिकन लीग बेसबॉलचा करार मिळालेले हे दोघे पहिले भारतीय ठरले. 2011 मध्ये जागतिक आॕल स्टार संघातही त्याला स्थान मिळाले होते. पण दुखापतींमुळे तो पुढे कुस्तीकडे वळला. 2018 मध्ये त्याने डब्ल्यूडब्ल्यूईसाठी करार केला. आता सौरव गुर्जरसोबत डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये यश मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

5) कविता देवी (कुस्ती डब्ल्यू डब्ल्यू ई – Wrestling / WWE)

कविता दलाल देवी ही तशी पारंपरिक भारतीय महिला. सलवार- कमीझ व दुपट्ट्यात राहणारी ही महिला कंबर कसून डब्ल्यू डब्ल्यू ईच्या आखाड्यात उतरली. डब्ल्युडब्ल्युईच्या आखाड्यात उतरणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. तिने वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2016 च्या साउथ एशियन गेम्समध्ये तिने 75 किलोगटात सुवर्णपदकही जिंकले आहे. ग्रेट ‘खली’ च्या मार्गदर्शनात ती तयार झाली आहे आणि खलीच्या काँटीनेंटल रेसलींग एन्टरटेनमेंटच्या माध्यमातून तिने व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. आता जागतिक पातळीवर पहिली भारतीय विजेती बनण्याचा तिचा प्रयत्न आहे.

6) टीम सिग्नीफाय (ई- स्पोर्टस्) (Team Signify- e-sports)

प्रोफेशनल गेमींगचे एक वेगळेच आणि अतिशय स्पर्धात्मक विश्व आहे. मल्टीप्लेयर व्हिडीओ गेममध्ये अतिशय स्पर्धा असते. त्यात मुंबईच्या ई स्पोर्टस् टीमने चांगले नाव कमावले आहे. पाच सदस्यांची ही टीम जगभरातील आघाडीच्या गेमींग स्पर्धांमध्ये सहभागी होत असते. डोटा 2 या मल्टीप्लेयर आॕनलाईन गेमींगमध्ये त्यांनी आपले एक नाव बनवले आहे. जुलै 2017 मध्ये ही टीम बनली आणि आतापर्यंत ते भारतात अपराजित आहेत. बऱ्याच आंतरराष्ट्रीय गेमिंग स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2018 मध्ये तैवानमधील एका स्पर्धेत ते विजयी झाले. आराओजी आॕनस्लॉट, इएसएल इंडिया प्रिमियरशीप या स्पर्धांत त्यांनी यश मिळवले आहे. आता इस्पोर्टसच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय यश मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

7) इशिता मालवीय (सर्फिंग) (Ishita Malviya- Surfing)

ही भारताची पहिली महिला प्रोफेशनल सर्फर आहे आणि आपल्या देशात सर्फिंगचाही खेळ शक्य आहे हे दाखवून देणारांपैकी ती एक आहे. हीसुध्दा जर्मनीत विद्यापीठ आदानप्रदान कार्यक्रमात गेली आणि ही क्रांती घडली. आपल्या 120 कोटींची लोकसंख्येत फक्त 13 च प्रोफेशनल सर्फर आहेत यावरुन इशिताने किती वेगळ्या प्रांतात उडी घेतली आहे याची कल्पना येते. ती आणि तिचा सहकारी तुषार पथियान यांनी शाका सर्फ क्लब सुरु केला आहे. हा क्लब ज्या गावात आहे त्या कोडी बेंगरे या गावातील मुलांना ते सर्फिंग व स्केटबोर्डिंग विनामूल्य शिकवते. इशिताला आशियातील अंडर 30 फोर्बस् 30 यादीत नामवंत खेळाडूंसोबत स्थान मिळाले आहे. इन्स्टाग्रामवर ती अतिशय लोकप्रिय आहे.

8) रितू फोगाट (कुस्ती, एमएमए) (Ritu Phogat- Wrestling MMA)

2016 च्या राष्ट्रकूल सामन्यांतील ही सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू आता मिक्स्ड मार्शल आर्टकडे वळली आहे. स्ट्राईकिंग, ग्रॕपलिंग आणि ग्राउंड फायटींग याचा मिळून हा खेळ आहे. यात रितु फोगाट आपल्या पहिल्याच वर्षात चार लढती जिंकून अपराजित आहे. तिने शेवटचा विजय फिलिपिन्सच्या जोमरे टोरेसवर विजय मिळवला आहे. 26 वर्षीय रीतूने पहिल्या फेरीतच ही लढत जिंकली होती. कुस्तीच्या कौशल्यांमुळे आपण सहज एमएमएकडे वळू शकलो असे ती सांगते.

9) शिवा केशवन (स्किइंग) (Shiva Keshvan- Skiing)

विंटर स्पोर्टसमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय पदके जिंकून देणारा शिवा केशवन हा एकमेव खेळाडू आहे.त्याने2011 मध्ये आशियाई सुवर्ण, 2009 मध्ये आशियाई रौप्य, 2008 मध्ये आशियाई कांस्य, 2005 मध्ये दुहेरीत आशियाई रौप्य आणि 2005 मध्ये आशियाई कांस्यपदक जिंकून दिले आहे. चार आॕलिम्पिकमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि स्किइंगच्या ल्युज या प्रकारात शिवा केशवन हे जानेमाने नाव आहे. 134.4 किलोमीटर प्रतीतास वेगाचा आशियाई विक्रम त्याच्या नावावर आहे.

10) दत्तु भोकनळ (रोइंग) (Dattu Bhoknal- Rowing)

नौकायन (रोइंग) या फारशा प्रचलित नसलेल्या क्रीडाप्रकारातही आपण यश मिळवू शकतो हे नायब सुभेदार दत्तु भोकनळ याने दाखवून दिले आहे. 2016 च्या आॕलिम्पिकमध्येही त्याने तिरंग्याचे प्रतिनिधित्व केले. आॕलिम्पिक खेळलेला तो भारताचा केवळ नववा नौकायनपटू आहे. 2018 च्या आशियाडमधील तो सुवर्णपदक विजेता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER