घुसखोर म्हणून पकडलेले निघाले भारतीय; मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

MNS - FIR Registered

पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध शोधमोहीम उघडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना बांगलादेशी घुसखोर म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीत ते बांगलादेशी नसल्याचे आढळून आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांसह आठ-नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात मनसेने बांगलादेशींविरोधात शोधमोहीम उघडली होती. पुण्यातील धनकवडी येथून तीन संशयित बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. मनसे कार्यकर्त्यांनी या लोकांना घरात घुसून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, पोलीस तपासात हे तिघेही भारतीय असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी मनसेचे अजय शिंदे आणि सचिन काटकर यांच्यासह आठ-नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांच्या प्रश्नांवरुन मनसेचा आदित्य यांना टोला

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, यापूर्वी मनसेने मुंबईत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा काढला होता. घुसखोरांना भारतातून हाकलण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर बोरीवली आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बांगलादेशींविरोधात शोधमोहीम हाती घेतली होती. काही वर्षांपासून बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांचा अनेक गुन्ह्यांत समावेश आढळून येत होता.

अमलीपदार्थांचे व्यवहार, ऑनलाईन फसवणुकीत बांगलादेशी नागरिक सक्रिय असल्याचे आढळले होते. हे रोखण्यासाठी पालघर पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून विरार, अर्नाळामधील २२ विनापरवाना भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यात १२ पुरुष, १० महिला आणि एका बालकाचा समावेश होता. हे सर्व आरोपी रोजगारासाठी भारतात गेल्या काही वर्षांपासून राहात होते. मजुरी आणि भंगाराचा व्यवसाय करत होते.