महिला फूटबॉलमध्ये भारताचा सलग पाचवा विजय

गोल्ड कप स्पर्धेत इराणवर एका गोलने मात

Women Football

भुवनेश्वर :- भारतीय महिलांनी गोल्ड कप फूटबॉल स्पर्धेत विजयी सुरूवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात त्यांनी शनिवारी इराणवर १-० असा विजय मिळवला. कलिंगा स्टेडियमवरच्या या सामन्यात भारताचा एकमेव गोल अंजू तमांग हिने ४८ व्या मिनिटाला केला.

भारतीय महिलांचा हा सलग पाचवा विजय ठरला. याआधी हाँगकाँग व इंडोनेशियाविरुध्दचे चार मैत्री सामने त्यांनी जिंकले.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला आपल्या दांगमेई ग्रेसने गोलक्षेत्रात धडक दिली होती. तिने गोलपोस्टकडे मारलेला फटका इराणीयन गोलकिपरने यशस्वीरित्या अडवला. १५ व्या मिनिटाला अंजूनेही बॉक्समध्ये मुसंडी मारली परंतू तिचा फटका गोलच्याबाहेर गेला. यानंतर सात मिनिटांनी संजूला हेडरवर संधी साधता आली नाही.

मध्यंतराच्या काही वेळ आधी इराणच्या सारा घोमिमर्झादश्ती हिने गोलपोस्टकडे मारलेला फटका भारतीय गोलरक्षक आदिती चौहान हिने झुकून अडवला. मध्यंतरानंतर रतनबाला व संजू या जोडीनेच सामन्यात निर्णायक ठरालेल्या गोलची संधी निर्माण केली. संजूने बचावफळीच्या मागून चेंडू काढत गोलरक्षकाला गोलपोस्टबाहेर येण्यास भाग पाडले आणि ती बाहेर आल्याचे पाहताच चेंडू अंजूकडे पास केला आणि अंजूने तो गोलमध्ये टाकण्यात कोणतीही चूक केली नाही. यानंतर इराणने प्रयत्न वाढवले परंतू भारतीय बचावफळी अभेद्य राहिली. यानंतर आणखी एकदा संजूचा फटका क्रॉसबारला लागून परतला.