भारतीय महिला खेळाडूही रोवताहेत यशाचे झेंडे; हम्पी, मानधना, विनेश ठरल्यात यशस्वी

vinesh phogat-smriti mandhana-koneru humpy

खेळांच्या मैदानात अलीकडे भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या संघाला धूळ चारल्याची चर्चा आहे; पण आपल्या महिला खेळाडूसुद्धा काही कमी नाहीत. त्या  खेळांच्या दुनियेत भारताचे नाव उंचावत आहेत. त्यात विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरु हम्पी (Koneru Humpy) , सातत्यपूर्ण फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि नंबर वन मल्ल विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले आहेत.

नेरुला बीबीसीचा पुरस्कार

रॅपिड  गटातील बुद्धिबळ विश्वविजेती असलेली कोनेरु हम्पी हिची बीबीसीने ‘इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ दी इयर’ म्हणून निवड केली आहे. अंजू बॉबी जॉर्ज (Anju Bobby George) हिला जीवन गौरव तर नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) हिची सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

विजयवाडा ते विश्वविजेती असा प्रवास केलेली कोनेरु हम्पी म्हणाली की, हा केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण बुध्दिबळ समुदायासाठी अतिशय मौल्यवान पुरस्कार आहे. इनडोअर खेळअसल्याने बुध्दिबळाला क्रिकेट वा इतर आउटडोअर खेळांसारखी लोकप्रियता नाही. पण यासारखे पुरस्कार लोकांना या खेळाकडे आकर्षित करतील. आपण एवढी सारी वर्षे यश मिळवत आहोत ते केवळ विश्वास आणि इच्छाशक्तीमुळे. महिला खेळाडूंनी कधीही खेळ सोडायचा विचार करू नये. लग्न आणि मातृत्व ह्या गोष्टी महिलांच्या जीवनाचाभागच आहेत. पण त्याच्याने आपल्या आयुष्याची दिशा बदलू नये, असे ती म्हणते.

बीबीसीचे सरसंचालक टीम डेव्ही हे व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात कोनेरु हम्पीला या पुरस्काराची घोषणा करताना म्हणाले की, कोनेरुचे खूप खूप अभिनंदन. तिने बुध्दिबळात भरपूर योगदान दिले आहे आणि ती या पुरस्काराची हक्कदार आहे.

अंजू बॉबी जाॕर्जला जीवन गौरव पुरस्कार

जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत अॕथलीट अंजू बॉबी जाॕर्ज म्हणाली की, आपल्या कारकिर्दीत आपल्याला अनेकांच्या सदिच्छा व आशीर्वाद लाभले आहेत. माझे आईवडील आणि पती यांच्या पाठिंब्याशिवाय मी हा प्रवास करुच शकले नसते.ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत.

मनू भाकर ठरली सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू

उदयोन्मुख खेळाडूसाठीचा पुरस्कार यंदाच सुरू करण्यात आला. त्याची विजेती ठरलेली मनू भाकर हिने युवा ऑलिम्पिक व राष्ट्रकुल  सामन्यांचे सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेतही दोन सुवर्णपदकांवर आपले  नाव कोरले आहे. ती म्हणते की, हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय  महत्त्वाचा आहे. माझ्या मेहनतीची दखल घेतली गेली आणि माझी कामगिरीलोकांपर्यंत पोहचली, असे आता वाटतेय.

स्मृती मानधनाचा अर्धशतकांचा विश्वविक्रम

क्रिकेटच्या मैदानावर भारताची यशस्वी सलामी फलंदाज स्मृती मानधना हिने एक विश्वविक्रम केला आहे. वन डे सामन्यांमध्ये पाठलाग करताना सलग १० अर्धशतकी खेळी करणारी ती पहिलीच (पुरुष वा महिला) क्रिकेटपटू ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा वन डे सामना ९ गडी राखून जिंकून देताना मंगळवारी तिने ६४ चेंडूंत  नाबाद ८० धावांची खेळी केली. या खेळीसह तिने पुरुषांनाही न जमलेला हा विक्रम केला. मार्च २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध  पाठलागात तिने ६७ धावा केल्या होत्या. तेव्हापासून ही अर्धशतकांची मालिका सुरू आहे.

तिचे पाठलागातीलही सलग १० अर्धशतके पुढीलप्रमाणे :
६७ – वि. ऑस्ट्रेलिया
५२ – वि. ऑस्ट्रेलिया
८६ – वि. इंग्लंड
५३ – वि. इंग्लंड
७३ – वि. श्रीलंका
१०५ – वि. न्यूझिलंड
९० – वि. न्यूझिलंड
६३ – वि. इंग्लंड
७४ – वि. वेस्ट इंडिज आणि
८० – वि. दक्षिण आफ्रिका

याच्याआधी वन डे सामन्यांत पाठलागात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम न्यूझीलंडच्या सूझी बेटस् हिच्या नावावर होता. तिने २०१५-१७  दरम्यान अशा ९ अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

विनेश फोगाट बनली ‘नंबर वन’

विनेश फोगाट हिने दोन दिवसांपूर्वीच मॕटीओ पेलिकोन रँकिंग सिरीज स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि यासह आपल्या ५३ किलो वजन गटात जगातील नंबर वन महिला कुस्तीगीर  बनण्याचा मान मिळवला. लागोपाठ दुसऱ्या आठवड्यात विनेश सुवर्णपदक विजेती ठरली. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती एकमेव भारतीय महिला मल्ल आहे. तिने मॕटीओ पेलिकोन स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या लढतीत कॅनडाच्या  डायना मेरी हेलेन विकर हिला ४-० अशी मात दिली. याच्याआधी किव्ह येथील स्पर्धेतही ती विजेती ठरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER