भारताच्या महिला बॉक्सर्सचे पैकीच्या पैकी यश!

Maharashtra Today

कोरोनामुळे चहुबाजूंनी भीतीदायक बातम्या येत असताना खेळांच्या मैदानातून भारतासाठी एक अतिशय चांगली बातमी आली आहे. भारतीय बॉक्सर्सनी (Indian Boxing) अतिशय घवघवीत यश मिळवले असून विश्व युवा बॉक्सिंग (World Youth Boxing) स्पर्धेवर आपल्या वर्चस्वाची छाप सोडली आहे. या स्पर्धेत भारताच्या सात महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्व सातच्या सात महिला बाॉक्सर सुवर्णपदक विजेत्या ठरल्या तर पुरुष खेळाडूपैकी सचिन याने 56 किलोगटाची अंतिम फेरी गाठली असून त्यालासुध्दा सुवर्णपदकाची संधी आहे. युवा गटाच्या खेळाडूंनी हे यश मिळवले असल्याने भारतीय बॉक्सिंगचे भविष्य उज्ज्वल असल्याचे हे चिन्ह आहे.पोलंडमधील (Poland) किल्स येथे ही स्पर्धा खेळली गेली.

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये गितिका (48 किलोगट), बेबीरोजिसना चानू (51 किलोगट), पूनम (57 किलोगट), विन्का (60 किलोगट), अरुंधती चौधरी (69 किलोगट), थोकचोम सनामचा चानू (75 किलोगट) आणि अलिफिया पठान (81 किलोवरील गट) यांचा समावेश आहे.

याआधी याच स्पर्धेत 2017 मध्ये भारतीय महिलांनी गुवाहाटी येथे पाच पदके जिंकली होती. भारतीय बाॕक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी या खेळाडूंचे कौतूक करताना म्हटले आहे की, कोरोनामुळे वर्षभर घरीच बसून रहावे लागल्यानंतर आणि केवळ आॕनलाईन प्रशिक्षणाआधारे तयारी करुन आपल्या युवा बॉक्सर्सनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. आपल्या मर्यादा व आव्हानांवर मात करत भारतीय प्रशिक्षक व सहकाऱ्यांनी अतियश उत्तम काम केले आहे आणि भारताच्या युवा बाॕक्सर्समध्ये किती गुणवत्ता आहे हे यातून दिसून आले आहे.

या स्पर्धेत भारताचे 20 खेळाडू सहभागी झाले.त्यापैकी पुरुषांमध्ये सचिनने अंतिम फेरी गाठली आहे तर विश्वमित्र चोंगथोम (49 किलोगट), अंकित नरवाल (64 किलोगट) आणि विशाल गुप्ता(91 किलोगट) यांनी कास्यपदक जिंकले आहे. हे तिघेही उपांत्य फेरीत पराभूत झाले. यासह भारताने या स्पर्धेत 11 पदकांची कमाई केली असून हे युवा विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील आपले सर्वात मोठे यश आहे. याच्याआधी 2018 च्या स्पर्धेत आपण 10 पदके जिंकली होती. या स्पर्धेत 52 देशांचे 414 बाॉक्सर सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button