संघनिवडीवर गावसकर व मांजरेकर यांच्या नाराजीने उठलेय वादळ, रोहित व राहुल समर्थकांचे ट्विटरयुध्द

Sanjay Manjrekar - Sunil Gavaskar - K L Rahul - Rohit Sharma

भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket team) निवड कधीही असू दे, वाद हा होतोच. सर्वांचे समाधान होईल असे होतच नाही. कुणाला आनंद तर कुणाची नाराजी स्वाभाविकच असते. आता यावेळीसुध्दा आॕस्ट्रेलिया (Australia tour) दौऱ्यासाठी जो संघ जाहीर करण्यात आला आहे त्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) , रिषभ पंत (Rishabh Pant) यांना वगळण्यावरुन आणि केएल राहुलच्या (K L Rahul) संघात पुनरागमनावरुन वेगवेगळे मतप्रवाह जोरात आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) व संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यासारख्या दिग्गजांनी टीका केलेली असल्याने उलटसुलट चर्चेला अधिक जोर चढलाय.

मनोज तिवारी या माजी क्रिकेटपटूनेसुध्दा सुर्यकुमार यादव व अक्षर पटेलसारख्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उपयुक्तता सिध्द केल्यावरही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कदाचित हे दोघे चुकीच्या काळात जन्माला आले असावेत असे म्हणावे लागेल असे त्याने म्हटले आहे.

सुनील गावसकर यांना तर रोहितला संधी न देण्यामागे काहीतरी गौडबंगाल वाटतेय आणि संघनिवडीची प्रक्रिया पायदर्शी असायला हवी असे म्हणत त्यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे तर संजय मांजरेकर यांनी म्हटलेय की आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे कसोटीसाठी संघनिवड करण्याचा चुकीचा पायंडा पडतोय आणि यामुळे रणजी ट्राॕफीसारख्या राष्ट्रीय प्रथम श्रेणी स्पर्धांचे अवमुल्यन होत आहे. हे विधान करताना संजय मांजरेकर यांनी के.एल.राहुलच्या निवडीकडे बोट दाखवले आहे.

आॕस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात रोहित शर्माला दुखापतीमुळे स्थान देण्यात आलेले नाही असे कारण दिले गेले मात्र ज्यावेळी संघनिवड जाहीर झाली त्याचवेळी रोहित मुंबई इंडियन्सच्या संघासोबत सराव करत होता. म्हणून गावसकर यांनी शंका उपस्थित केली आहे. रोहितची पायाची नडगी दुखावल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या सामन्यांमध्येही त्याचा सहभाग अनिश्चित आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित व इशांत शर्माच्या तंदुरुस्तीकडे नजर ठेवून असेल. मात्र यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार सराव करत असल्याचे व्टिट केल्याने शंका उपस्थित झाल्या आहेत.

गावसकर यांनी म्हटले आहे की, कसोटी सामने अजून दीड महिन्यांनी होणार आहेत. तो सराव करतोय त्यामुळे त्याची दुखापत नेमकी कशी आहे ते कळायला मार्ग नाही. त्याला नेमके काय झालेय याबाबत थोडे मोकळेपणाने व स्पष्टपणे सांगितले गेले तर सर्वांनाच मदत होईल.

मयांक अगरवालसुध्दा पंजाबसाठी गेल्या काही सामन्यांमध्ये खेळला नाही पण त्याला संधी देण्यात आली हा विरोधाभास गावसकर यांनी लक्षात आणून दिला आहे. नेमके काय चाललेय हे जाणून घेण्याचा भारतीय क्रिकेटप्रेमींना अधिकार आहे. फ्रँचाईजींचे मी समजू शकतो कारण प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात ठेवण्यातच त्यांचा फायदा असतो पण भारतीय संघाचा जेंव्हा विषय येतो तेंव्हा क्रिकेटप्रेमींना सर्व गोष्टी नेमकेपणाने कळायला हव्यात असे गावसकर यांनी म्हटले आहे.

रोहितने भारतासाठी शेवटच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये 92.67 च्या सरासरीने तीन शतकांसह 556 धावा केल्या आहेत. तर याच काळात इशांत शर्माने 17.37 च्या सरासरीने 19 बळी मिळवले आहेत.

रोहित नसल्याने त्याच्या जागी के.एल. राहुल उपकर्णधार असेल. के.एल.राहुलची आयापीएलमध्ये गेल्या सलग तीन मोसमात कामगिरी चांगली झाली असली तरी मागच्या पाच कसोटी मालिकांत तो सपशेल अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द त्याची सरासरी फक्त 7.1, इंग्लंडविरुध्द 29, वेस्ट इंडिजविरुध्द भारतात 18, आॕस्ट्रेलियाविरुध्द 10.7, विंडीजविरुध्द 25.4 अशी त्याची सरासरी राहिली आहे.

अशा कामगिरीनंतरही राहुलला संघात स्थान मिळालेय म्हणजे तो सुदैवीच म्हणायला हवा, मर्यादीत षटकांच्या सामन्यांतील कामगिरीआधारे त्याने कसोटी संघात स्थान मिळवलेय. आता या संधीचा त्याने फायदा उचलावा अशा शब्दात संजय मांजरेकर यांनी राहुलच्या निवडीवर आक्षेप घेतला,आहे.

मात्र संजय मांजरेकरचा हा दावा काही क्रिकेटप्रेमींनी खोडून काढला आहे. 2019-20 च्या रणजी स्पर्धेतील कामगिरीचा हवाला देत एकाने म्हटलेय की आघाडीच्या फलंदाजात त्या मोसमात राहुलच्या तोडीचा एकही नव्हता. विराट व रोहितनंतर राहुलच येतो. काहीवेळा नियम मोडून वेगळ्या वाटेने जाणेही फायद्याचे असते. नियमांची फूटपट्टी लावली तर रोहितलाही कसोटी संघात स्थान मिळणार नाही. आणि अजिंक्य रहाणेचे काय? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.

सद्यस्थितीत राहुलची सरासरी ही सर्वच प्रकारच्या सामन्यांमध्ये 50 च्यावर आहे. विराटनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील तो सर्वोत्तम फलंदाज आहे. आॕस्ट्रेलिया दौऱ्यावर अपयश सोडले तर त्याची कामगिरी चांगलीच आहे त्यामुळे आता फाॕर्मात असताना संघात त्याला स्थान देणे योग्यच असल्याचे के.एल.राहुलच्या समर्थकांनी म्हटले आहे.

त्यांचा असाही दावा आहे की रोहीत शर्मासुध्दा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधुनच पुढे आला आहे. त्याला संधी दिली तेंव्हा खरं तरा ईश्वरन व इतर राष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिक धावा करत होते. मर्यादीत षटकांमध्ये रोहीत बेस्ट आहे यात वाद नाही. पण नवा सलामी फलंदाज अजमावून पाहण्यात गैर काय आहे, असा सवाल काहींनी केला आहे.

मांजरेकर यांचा दावा खोडून काढताना राहुलच्या समर्थकांनी म्हटलेय की, फक्त दोनच प्रथम श्रेणी डाव खेळल्यावर रोहितला ईश्वरन व प्रियांक पांचाळ यांच्यापुढे संधी देण्यात आली हे दुर्लक्षून चालणार नाही.

एका क्रिकेटप्रेमीने तर्कशुध्द कारणमिमांसा करताना असे म्हटलेय की, बऱ्याच काळापासुन कसोटी क्रिकेट व प्रथम श्रेणी क्रिकेट ठप्प आहे म्हणून निवडकर्त्यांनी कदाचित सध्या फाॕर्मात असलेल्या खेळाडूंची निवड केली असावी. आणि राहुल संघात आहे पण प्लेइंग इलेव्हन अजून ठरलेली नाही.

मात्र याच्याशी असहमत असणाऱ्यांनी म्हटलेय की कसोटीत अपयशी झाला तर राहुच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यातील कामगिरीवरही परिणाम होतो. हे दिसुन आलेले आहे. पुढे आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा असताना रोहितला वगळून राहुलला खेळवणे हा फार मोठा धोका आहे.

काहींना यात राजकारण दिसुन येतेय. त्यांच्यामते विराट कोहली हा स्वतः रोहित शर्मा व त्याच्या संघातील इतरांना बाहेरच ठेवतोय. त्यांना तो कधीच संधी देणार नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. म्हणून भारतीय संघात राॕयल चॕलेंजर्स बंगलोरचेच सैनी, सिराज, सुंदर व दुबेसारखे खेळाडू दिसतील अशी टीका होतेय. बंगलोरच्या खेळाडूंशिवाय भारतीय संघ कोणताही सामना जिंकू शकतो पण मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंशिवाय नाही हे मान्य करावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER