अन्य देशांच्या तुलनेत भारतीय रुपया बराच सक्षम

रुपयातील घसरण फक्त ७ टक्के, बाकी देशातील घसरण १० टक्क्यांच्यावर

Indian rupee

मुंबई : भारतीय रुपया डॉलरसमोर कमकुवत होऊन पुन्हा किंचीत मजबूत झाला. तरीही सध्या एका डॉलरची किंमत ७० रुपयांच्यावर असल्याने आर्थिक क्षेत्रात अस्वस्थता आहे. पण तसे असले तरी भारतीय रुपयाचे अन्य विकसित देशांच्या तुलनेत बरेच सक्षम असल्याचे एका परिषदेत समोर आले आहे.

भारतीय उद्योग महसंघाकडून सध्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विविध आर्थिक विषयांवर ऊहापोह केला जात आहे. सध्या देशात गाजत असलेल्या सर्वच आर्थिक विषयांवर ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ केले जात आहे. यामध्येच शुक्रवारी वित्त संस्था व बँकिंगमुळे सध्या अस्थिर असलेल्या शेअर बाजारासंबंधी चर्चा झाली. त्यासाठी ‘वित्त बाजार परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाचे अध्यक्ष अजय त्यागी यावर माहिती दिली.

ही बातमी पण वाचा : शेअर बाजारची सुरुवात ५०० अंकाच्या घसरणीने

इंधनाच्या वाढत्या किमती व निर्यातीपेक्षा आयात अधिक झाल्याने चालू आर्थिक वर्षात तीन महिन्यात रुपया डॉलरसमोर ७ टक्के घसरला आहे. पण जपान, चीन, ब्रिटन, ब्राझील व युरो या चलनांमधील घसरण रुपयापेक्षाही अधिक आहे. जपानी येन डॉलरसमोर ७.३ टक्के, चीनी रेनमिनबी १०.८१, ब्रिटीश पौंड १०.१० टक्के, ब्राझिलचे रिअल १६.८५ टक्के व युरोमध्ये ८.७३ टक्के घट झाली.

शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असल्याचे मत परिषदेत समोर आले. त्यागी यांनी मात्र अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार सर्वाधिक सुरक्षित असल्याचे मत मांडले. एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६.५० टक्के परतावा दिला. पण याच काळात ब्रिटनमधील शेअर बाजारातील परताव्यात एक टक्का व चीनमधील बाजारांच्या परताव्यात १८ टक्के घसरण झाली. ब्राझिल व जपानमधील बाजारांचा परतावा अनुक्रमे ५.७ टक्के व ४.५ टक्के होता. भारतीय शेअर बाजार सध्या १२ टक्के अस्थिर आहे.

ही बातमी पण वाचा : स्वदेशी एचसीएल करणार विदेशी आयबीएमचे अधिग्रहण

ब्रिटनमधील बाजारसुद्धा १२ टक्के अस्थिर आहे. पण अमेरिकेतील बाजार १६ टक्के, चीनमधील १९ टक्के, जपानमधील १७ टक्के, दक्षिण कोरीयातील १४ टक्के, हाँगकाँगमधील १९ टक्के व ब्राझिलमधील शेअर बाजार २१ टक्के अस्थिर आहे.