आंतरराष्ट्रीय हॉकीवर भारतीय खेळाडूंची छाप

जिंकले चार मानाचे पुरस्कार कर्णधार मनप्रीत व राणी रामपालसह विवेक व लालरेमसियामी यांना सन्मान

भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसन्मानाचे दिवस आले आहेत. भारतीय हॉकीपटूंना गतवर्षीसाठीचे प्रमुख मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. यात भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) २०१९ चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू जाहीर केले आहे तर महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हिला ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट आॅफ दी इयर’ पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय युवा खेळाडू विवेक सागर व लालरेमसियामी यांना ‘एफआयएचचा उदयोन्मुख खेळाडूंचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याप्रकारे २०१९ साठीचे चार मानाचे पुरस्कार भारतीय हॉकीपटूंनी पटकावले आहेत. याशिवाय आपले दोन्ही संघ, पुरुष व महिला, टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

बुमराने क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले

मनप्रीतसिंगने तर ‘एफआयएचचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवून इतिहास घडविला आहे कारण यापूर्वी एकाही भारतीय हॉकीपटूला हा पुरस्कार मिळालेला नव्हता. १९९९ पासून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. बेल्जियमच्या आर्थर व्हॅन डोरेन व अर्जेंटीनाच्या लुकास व्हिला यांच्या स्पर्धेत मनप्रीत सर्वोत्तम ठरला. २०११ मध्ये पदार्पण केल्यापासून मनप्रीत २६० आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून गेल्यावर्षी त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला. २०१९ मध्ये प्रत्येक स्पर्धेत आमच्या संघाने चांगली कामगिरी केली. जूनमधील एफआयएच सिरिज फायनल्स आणि स्पेन व बेल्जियममधील कसोटी मालिका आपल्या संघाने जिंकल्या असे मनप्रीत अभिमानाने सांगतो. असे असले तरी हॉकी विश्वातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार आपल्याला अनपेक्षित होता अशी पहिली प्रतिक्रिया मनप्रीतने दिली होती.

२१ वर्षात हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरणे हे खरोखरीच विशेष आहे. म्हणूनच आपल्याला अधिक आनंद आहे असे तो म्हणतो. यंदा आलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणे हे आपले ध्येय आहे आणि त्या आव्हानासाठी आपण तयार आहोत. त्यात हा पुरस्कार आम्हाला अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यास प्रेरीत करेल असे त्याने म्हटले आहे.

महिलांमधील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरलेली लालरेमसियामी हिनेसुद्धा हिच भावना व्यक्त केली आहे. ती म्हणते की या पुरस्काराने आमच्यात विश्वास वाढला असून प्रेरणासुद्धा मिळाली आहे. बºयाच चांगल्या खेळाडूंच्या स्पर्धेत आपण मानकरी ठरलो यासाठी हॉकीत कारकिर्द करण्याची परवानगी देणाºया आपल्या कुटुंबाचे तिने आभार मानले आहे. मला हे पुरस्कार किती महत्त्वाचे अ ाहेत हे सुरुवातीला माहिती नव्हते पण गतविजेत्यांची यादी पाहिल्यावर मला त्यांचे महत्त्व पटले. आपली कर्णधार व प्रेरणास्त्रोत राणी रामपालकडून हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद असल्याचे लालरेमसियामी म्हणते.

राणी रामपालला तर ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट आफ दी इयर’ पुरस्कारासाठी केवळ हॉकीच नाही तर इतर खेळांच्याही सर्वोत्तम खेळाडूंमधून स्पर्धा होती पण त्यातही तिने मोठ्या फरकाने बाजी मारली आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली.

एफआयएचचे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)

२०१९- मनप्रीतसिंग (भारत)
२०१८- आर्थर व्हॅन डोरेन (बेल्जियम)
२०१७- आर्थर व्हॅन डोरेन (बेल्जियम)
२०१६- जॉन जॉन डोमेन (बेल्जियम)
२०१५- रॉबर्ट व्हॅन डर हॉर्स्ट (नेदरलँड)
२०१४- मार्क नोल्स (आस्ट्रेलिया)
२०१३- तोबियास हॉक (जर्मनी)
२०१२- मॉरित्झ फुरस्ट (जर्मनी)
२०११- जेमी व्डेर (आस्ट्रेलिया)
२०१०- जेमी व्डेर (आस्ट्रेलिया)