भारतीय फुटबॉल संघाने पराभवातही मने जिंकली

युएईविरुध्दच्या पराभवात प्रभावी खेळ, गोलच्या संधी थोडक्यात हुकल्या

Sunil Chetri

अबुधाबी :- एएफसी आशिया कप फूटबॉल स्पर्धेत भारतीय संघ गुरुवारी यजमान संयुक्त अरब अमिराती (युएई) संघाकडून पराभूत झाला असला तरी फुटबॉलप्रेमींची मने मात्र भारतीय संघाने जिंकली आहेत. या सामन्यात भारताने विजयासाठी गोल सोडून बाकी सर्व गोष्टी केल्या आणि नशिबाची फक्त १० टक्के जरी साथ भारतीय संघाला लाभली असती तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा राहिला असता, अशी या सामन्यानंतर खूद्द युएई समर्थकांची प्रतिक्रियाच मोठी बोलकी आहे.

पहिल्या सामन्यात थायलंडला ४-१ असे नमविल्यानंतर आपल्या संघाने गुरुवारचा हा सामना २-० असा गमावला परंतु, यात सुनील छेत्रीचा अगदी थोडक्यात बाजूने गेलेला हेडर गोलमध्ये गेला असता आणि उदांताचा फटका फक्त एखादा सेंटीमीटर खाली राहिला असता तर …चित्र वेगळेच राहिले असते. त्यामुळे या हुकलेल्या संधींबद्दल कर्णधार सुनील छेत्रीने खंत व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : नेटफ्लिक्स (NETFLIX) होणार बंद ?

खरं म्हणजे युएईचा संघ भारताच्या तुलनेत बलाढ्य…जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा १८ स्थाने वर आणि भारताविरुध्दच्या १३ पैकी ८ सामने जिंकलेला…पण गुरुवारी छेत्रीच्या संघाने अशी लढत दिली की युएई समर्थकांनी त्याची अपेक्षाच केलेली नव्हती.

पहिल्या हाफमध्ये तर भारतीय एवढे वरचढ ठरले की मध्यंतरात युएईच्या खेळाडूंनी त्यांचे प्रशिक्षक अल्बर्टो झाच्चेरोनी यांच्यासमोर मान्यच केले की भारतीय संघाकडून एवढा धारदार खेळ अपेक्षित नव्हता. झायेद स्पोर्टस् सिटी स्टेडियमवर जमलेल्या ४३ हजारावर प्रेक्षकांपैकी बहुतेकांचेही हेच मत होते. झाच्चेरोनी यांनी तर हा भारतीय संघ म्हणजे आशियाई फूटबॉलचा भविष्याचा संघ असल्याचे म्हटले आहे. अमिरातीच्या पत्रकारांनीही युएईच्या संघाची घरच्या मैदानावर एवढी परीक्षा कुणी घेतली नसल्याचे सांगितले.

पहिल्या २२ मिनिटातच भारताच्या गोलच्या तीन संधी हुकल्या. सुनील छेत्री व आशिक कुरुनियान कमनशिबी ठरले. यापैकी एक जरी संधी साधली गेली असती तर भारतीय संघ १-० ने पुढे गेला असता आणि यजमानांवर दडपण आले असते, आणि दडपणाखाली बऱ्याचदा चूका होतात, असे छेत्रीने सामन्यानंतर म्हटले आहे. दुसऱ्या हाफमध्येही उदांताच्या फटक्यावर चेंडू खांबाला लागला. फक्त एक-दोन सेंटीमीटरच्या फरकाने गोल हुकला. अशा महत्वाच्या सामन्यांमध्ये संघांदरम्यान फरक फारच थोडा असतो आणि त्यात अशा संधी हुकणे महागात पडते, असे छेत्री म्हणतो.

‘अ’ गटात एक विजय आणि एक पराभव नावावर लागलेल्या भारतीय संघाचा आता बहारीनसोबत सामना (१४ जानेवारी) बाकी आहे. मात्र अजुनही भारताला अंतिम १६ संघात स्थान मिळण्याची संधी आहे. या गटात अमिरातीचा संघ आघाडीवर आहे आणि गटातून पहिल्या दोन संघांना पुढच्या फेरीत प्रवेश मिळणार आहे.

ही बातमी पण वाचा : ऑपरेटिंग, कमर्शियल संघ विजयी; डीआरएम चालेंज क्रिकेट चषक

आता १४ तारखेला भारताने सामना जिंकला तर सहा गुणांसह ते पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. थायलंडने युएईला बरोबरीत रोखले किंवा पराभूत केले तर भारतीय संघ गटात पहिल्या स्थानी राहिल. भारताला बहारीनने बरोबरीत रोखले तर युएईने थायलंडला हरवले किंवा बरोबरीत रोखले तरच भारताला आशा आहेत. भारताने बहारीनचा सामना गमावला तर युएईने थायलंडला नमविणे आणि भारताची गटवार तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चार संघात वर्णी लागणे यावर आपल्या संघाची प्रगती अवलंबून राहिल.