भारतीय लोकशाही स्थिर नसून गतीशील : गोविंद निहलानी

govind-nihlani

पुणे :- बदलत्या काळानुसार नवीननवीन सामाजिक प्रश्नही सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नसून ती गतीशील स्वरुपाची आहे. लोकशाही विकसित होण्याची ही प्रक्रिया निरंतर होत असून काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जात असतात. सध्याच्या काळात आपण लोकशाहीच्या संक्रमणावस्थेतून जात असून गतीशील लोकशाही हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी सांगितले. मात्र नयनतारा सहगल या मुद्यावर थेट भाष्य करणे टाळले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘पिफ फोरम’चे उदघाटन गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी निहलानी यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सामाजिक व्यवस्था, असहिष्णुता या मुद्यांवर सावध भूमिका घेतली.

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी कलात्मक लिखाणात लेखकाची स्वत:ची विचारप्रक्रिया फार महत्त्वाची असते आणि ती कुणीही तुम्हाला शिकवू शकत नाही. तुमच्यातच ती असायला हवी असे ते म्हणाले. निहलानी म्हणाले, माझा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित होण्यात ज्येष्ठ नाटककार व लेखक विजय तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. लेखक म्हणून त्यांच्या कामात सखोलता होती. मला तर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालेच, भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. परंतु माझ्या मते त्यांना या माध्यमातून जी जी अपेक्षित ओळख मिळायला हवी होती ती मिळाली नसल्याचे ते म्हणाले.