सलामी फलंदाज काढताहेत भारतीय गोलंदाजांची लक्तरे

IND vs AUS - Jasprit Bumrah

जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) , मोहम्मद शामी (Mohammed Shami), नवदीप सैनी, युझवेंद्र चहल अशा गोलंदाजांमुळे जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या आक्रमणापैकी एक असलेल्या भारतीय (India) गोलंदाजीची सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन (Australia) फलंदाजांनी लक्तरे काढली आहेत. आरोन फिंच -Aaron Finch (60) व डेव्हिड वॉर्नर David Warner (83) यांनी 156 धावांच्या सलामीपाठोपाठ 142 धावांची सलामी दिली आहे. याप्रकारे गेल्या सलग पाच वन डे सामन्यात भारतीय गोलंदाज पॉवर प्लेमध्ये विकेट मिळवू शकलेले नाहीत आणि या पाचही सामन्यात प्रतिस्पर्धी संघांनी 85 पेक्षा अधिक धावांची सलामी दिली आहे. अर्थातच आधीचे चारही सामने भारताने गमावले आहेत, त्यात न्यूझीलंडविरुध्दचे सलग तीन पराभव आहेत आणि आता पाचव्यातही चिन्हे फारशी चांगली नाहीत.

ऑस्ट्रेलियाचे आरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर ही जोडी तर भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या दोघांनी भारताविरुध्द गेल्या 14 पैकी 9 सामन्यात किमान अर्धशतकी सलामी दिली आहे आणि त्यात पाच शतकी भागिदाऱ्या आहेत. या पाचपैकी दोन तर 231 व 258 धावांच्या द्विशतकी भागिदारी आहेत. त्यामुळे कपिल देव यांच्यासारखे धुरंधर आजच्या घडीला भारतीय जलद गोलंदाजांचा मारा सर्वोत्तम असल्याचे म्हणत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.

न्यूझीलंडविरुध्दच्या मालिकेत भारताविरुध्द 85, 93, 106 आणि आता ऑस्ट्रेलियाने 156 व 142 धावांची सलामी दिलेली आहे. या पाचही सामन्यात पॉवर प्लेमध्ये भारतीय गोलंदाजांना विकेट तर काढता आलीच नाही आणि स्कोअर अनुक्रमे 54, 52, 65, 51 व 59 असा राहिला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचे अपयश स्पष्ट झाले आहे.

यामुळे एका कॕलेंडर वर्षात किमान 5 सामने खेळलेल्या संघांमध्ये भारताची पहिली विकेट काढण्याची सरासरी 125.42 अशी सर्वात खराब आहे. दुसऱ्या स्थानी केनियाचा संघ आहे ज्यांची 2001 मध्ये सरासरी 104.37 होती. यामुळे आता पुढच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन सलामी जोडी शून्यावर जरी फोडली तरी भारताची सरासरी सर्वात खराबच राहणार आहे. भारत व केनियानंतर बांगलादेशची (1997) सरासरी 96 धावांची आणि झिम्बाब्वेची यंदाच सरासरी 84.83 धावांची आहे.

ही महागडी सरासरी भारताच्या नावावर यामुळे लागली आहे की, गेल्या पाच सामन्यात भारताविरुध्द प्रतिस्पर्धी संघांची सलामी एकदाही 85 धावांच्या खाली राहिलेली नाही आणि गेल्या सलग तीन सामन्यात भारताविरुध्द शतकी सालामी लागली आहे. फिंच व,वॉर्नरच्या 142 व 156 धावांच्या सलामीआधी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तील व निकोल्स यांनी 106 धावांची सलामी दिली होती. एखाद्या संघाविरुध्द सलग तीन सामन्यात शतकी सलामी लागण्याची वन डे सामन्यांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. आता या मालिकेतील आणखी एक सामना बाकी आहे आणि त्यात तरी भारतीय गोलंदाज आपले हे अपयश पुसून काढू शकतील का, हाच प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER