कोरोना चाचण्यांचा गोंधळ आणि भारतीय बॅडमिंटनपटूंना फटका !

सध्या कोरोनाचे थैमान आहे आणि त्याचा फटका खेळाडूंना बसतोय…विशेषतः बॅडमिंटनपटूंना, (Badminton) त्यातल्या त्यात भारतीय बॅडमिंटनपटूंना तर कोरोना जरा जास्तच छळतोय. ताज्या घटनेत प्रतिष्ठेच्या आॕल इंग्लंड बॅडमिंटन चॕम्पियनशीपच्या (All England Champioship) आधीच तीन भारतीय खेळाडू कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले आहे तर साईना नेहवाल (Saina Nehwal) व पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) हे आपल्या कोरोना चाचणी अहवालची वाट बघून बघून वैतागले आहेत.या अहवालाअभावी त्यांचा सराव आणि व्यायाम सर्वच खोळंबले असून या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दोन महिन्यापूर्वी थायलंडमधील स्पर्धेवेळीसुध्दा साईनासह भारतीय बॅडमींटनपटूंना कोरोना चाचण्यांचा असाच त्रास झाला होता.त्यांना पुन्हा पुन्हा चाचण्या दाव्या लागल्या होत्या, किदांबी श्रीकांतच्या तर नाकातून रक्तस्राव व्हायला लागला होता आणि भारतीय खेळाडूंनी चाचण्यांमध्ये अनियमीततेची तक्रार केली होती. त्यानंतर आता बॅडमिंटनमधील सर्वात प्रतिष्ठेची आॕल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा बुधवारी सुरु होत असताना तीन भारतीय खेळाडू पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे तर इतरांना आपल्या अहवालांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे या स्पर्धेत मैदानावर उतरण्याआधीच भारतीय चमूच्या वाटचालीत खीळ पडली आहे. तीन खेळाडूंशिवाय सहकारी चमूतीलही एक जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.

भारतीय चमूचे प्रशिक्षक मथायस बो यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार तीन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील एक जण बाधीत आढळून आला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच स्वीस ओपन स्पर्धेनिमित्ताने आम्ही झ्युरिक येथे आयसोलेटेड असताना हे कसे घडले तेच कळत नाही असे बो यांनी म्हटले आहे. 14 दिवसात पाच वेळा आमच्या चाचण्या झाल्या आहेत आणि त्या सर्व ‘निगेटिव्ह’ आल्या आहेत. असे असताना अचानक चार जण कसे पॉझिटिव्ह येऊ शकतात.

जे खेळाडू व स्टाफ पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येतआहे त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाही आणि ते बाधित असल्याबद्दल अधिकृत पुष्टीसुध्दा झालेली नाही.

दरम्यान, कोरोना चाचण्यांबद्दलच्या गोंधळाचा फटका साईना नेहवाल व पारुपल्ली कश्यप या भारताच्या आघाडीच्या जोडप्यालासुध्दा बसला आहे. यापैकी साईना अहवाल जवळपास 30-32 तास उलटल्यानंतरही मिळालेला नाही तर पारुपल्लीच्या अहवालातून काहीच ठोस निष्पन्न झालेले नाही.

या गोंधळासंदर्भात पारुपल्लीने जागतिक बॅडमिंटन महासंघाला (BWF) एक ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटलेय की, या कशाप्रकारच्या चाचण्या आहेत? 31 तास उलटूनही काहीच निष्पन्न होत नाही आणि पुन्हा चाचणी द्यायला सांगताहेत. ती कधी होईल देव जाणे…मात्र सामन्यांना आज सुरूवात होणार आहे!

साईनानेसुध्दा आपण सराव करु शकत नसल्याची तक्रार केली आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, बघा, मला काय करावे लागतेय! सामने लवकरच सुरु होणार आहेत आणि 30 तासांपेक्षा अधिक वेळेपूर्वी दिलेल्या चाचणीचा अजून अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून सराव करता येत नाही, व्यायामशाळेत जाता येत नाहीये.

आॕलिम्पिक कास्यविजेती आणि 2015 च्या आॕल इंग्लंड ओपनची साईना उपविजेती आहे. तिला यंदा जानेवारीत थायलंडमध्येही कोरोना चाचण्यांपायी असाच त्रास झाला होता.त्यावेळी तीन तीन चाचण्या झाल्या.त्यापैकी तिसऱ्या चाचणीत ती पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले होते पण नंतर आणखी चौकशीअंती तिला खेळू देण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER