भारतीय लष्कराची सामरिक क्षमता होणार सुदृढ

Indian Army

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सामरिक क्षमता सुदृढ करण्यासाठी युद्धस्थितीत २०२२- २३ पर्यंत ४० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात रॉकेट्स, मिसाइल्सपासून अत्याधुनिक टँक आणि आर्टिलरी शेल्सचा समावेश आहे.

आज युद्ध झाले तर भारताकडे अखंड १० दिवस युद्ध सुरु ठेवतायेईल इतका शस्त्रसाठा आहे. याला १० (i) पातळीवरील युद्धसज्जता म्हणतात. भारताचे लष्कर ही युद्धसज्जता ४० (i) करणार आहे. याची तयारी सुरू झाली आहे.

सध्याची भारताची १० (i) पातळीवरील युद्धसज्जता पश्चिम (पाकिस्थान) सीमेवरील युद्धस्थितीच्या दृष्टीने आहे. पण पाकिस्तान आणि चीनचा धोका लक्षात घेता ही युद्धसज्जता ४० (i) आवश्यक आहे. यासाठी जवळपास १२ हजार ८९० कोटी रुपयांचे २४ करार प्रस्तावित आहेत. यात १९ परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या करारांचा समावेश आहे. २०२२ नंतर पुढील १० वर्षांसाठी स्वदेशी कंपन्यांचे विविध परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करून विविध पद्धतीचे लष्करी टँक आणि इतर शस्त्रास्त्र निर्मिती करण्यासाठी देशाला सक्षम करण्याचा मानस संरक्षण मंत्रालयाचा आहे. यासाठी वार्षिक १,७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

उरी हल्ल्यानंतर सज्जता

या संदर्भात उल्लेखनीय आहे की अनेक वर्षांपासून भारतीय लष्करातील टँकपासून एअर डिफेन्स युनिटच्या कमतरतेसंबंधी प्रश्न निर्माण केले जात आहेत. २०१६ सालच्या उरी हल्ल्यानंतर सरकारने याकडे गंभीरतेने लक्ष घातले आणि सध्याची १० (i) पातळीवरील युद्धसज्जता ४० (i) करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रांपासून ते टँकच्या इंजिनापर्यंत एकूण २४ हजार कोटी रुपयांचे करार केले. यात स्मर्च रॉकेट, अँटी-टँक गायडेड मिसाईल, १२५ एमएम एपीएफएसडीएस आणि इतर अत्याधुनिक शस्त्रांसाठी रशिया व इतर देशांसोबत करार केले गेले.