आशियाई क्रिकेटवर भारताचे राज्य कायम

India pip Bangladesh in thriller to win U-19 Asia Cup
  • १९ वर्षाआतील आशिया कप क्रिकेटचे विजेतेपद
  • १०६ धावात बाद झाल्यावरही बांगलादेशवर पाच धावांनी विजय
  • क्रिकेटमध्ये भारत २० व्यांदा आशियाई चॅम्पियन
  • सामनावीर अथर्व अंकोलकरचे पाच बळी
  • अर्जुन आझाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू

कोलंबो : आशियाई क्रिकेटमध्ये भारताला तोड नाही हे शनिवारी आपल्या १९ वर्षाआतील मुलांच्या संघानेसुद्धा दाखवून दिले. १९ वर्षाआतील गटाच्या आशिया चषक स्पर्धेचे त्यांनी नाट्यमयरित्या विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने अवघ्या १०६ धावातच बाद झाल्यानंतरही पाच धावांनी विजय मिळवून या वयोगटातील आशियाई विजेतेपद सातव्यांदा पटकावले. भारताच्या सिनियर संघानेही आशिया चषक सात वेळा तर महिला संघाने आशिया चषक सहा वेळा जिंकला आहे. याप्रकारे क्रिकेटमध्ये भारताने जिंकलेले हे विसावे आशियाई विजेतेपद असून एवढे यश तिर कोणत्याही संघाला मिळालेले नाही.

आरपीएस स्टेडियमवरच्या या अंतिम सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो मुंबईचा डावखुरा युवा फिरकीपटू अथर्व अंकोलेकर. त्याच्या २८ धावात पाच बळींच्या कामगिरीमुळेच बांगलादेशला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान भारी पडले. त्यांचा डाव ३३ षटकातच १०१ धावांमध्ये आटोपला. त्याआधी भारताचा डाव ३२.४ षटकात १०६ धावांमध्ये आटोपला होता.

युवा क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येत जिंकलेल्या सामन्याचा हा नवा विक्रम आहे. यापूर्वीचा विक्रम नेपाळने १०७ धावांचे केनियाविरुध्द केलेल्या सफल रक्षणाचा होता. २००० सालच्या १९ वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत नेपाळने १०७ धावांत बाद झाल्यावरही तो सामना जिंकला होता. आता भारताने १०६ धावांत सामना जिंकून दाखवला.

या स्पर्धेचे उपांत्य सामने पावसामुळे होऊ शकले नव्हते त्यामुळे गटातील अव्वल स्थानाच्या आधारे भारत व बांगला देशच्या संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले होते आणि श्रीलंका व अफगणिस्तानचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले होते.

भारताच्या डावात कर्णधार ध्रुव जुरेल (३३), अष्टपैली करणलाल (३७) आणि शाश्वत रावत (१९) हे तीन वगळता इतर फलंदाज एकेरी धावांतच बाद झाले.
बांगलादेशी जलद गोलंदाज मृत्यंजय चौधरी व आॅफ स्पिनर शामीम हुसेन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

त्यानंतर आकाश सिंगच्या भेदक गोलंदाजीने बांगलादेशची सुरूवातीलाच ४ बाद १६ अशी घसरगुंडी उडवून दिली. त्याने पाचच षटकात १२ धावात तीन बळी मिळवले. त्यानंतर बांगलादेशी कर्णधार अकबर अली (२३) याने मृत्युंजय (२१) सोबत प्रतिकार केला.

अतिशय कमी धावसंख्येच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय, भारतीय गोलंदाजांनी दिलेल्या १८ अवांतर धावा आणि नवव्या गड्यासाठी तांझिम हसन शकिब (१२) आणि रकिबूल हसन (नाबाद ११) यांच्या भागीदाराने भारत सामना गमावणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती पण पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू झाल्यावर अकबर अली व मृत्युंजय यांनी आत्मघाती फटक्यात विकेट गमावल्यावर सामन्यात भारताने मुसंडी मारली. आकाश सिंगच्या धमाक्यानंतर तळाकडे अथर्व अंकोलेकर प्रभावी ठरला आणि कर्णधार अकबर अलीला स्वत:च झेल घेत बाद करत भारताला सामन्यात आणून ठेवले.

अंतिम सामन्यात २८ धावांत पाच बळींच्या कामगिरीसाठी अंकोलेकर सामनावीर ठरला तर भारताचा सलामीवीर अर्जुन आझाद हा स्पर्धेतील सर्वोत्त्कृष्ट खेळाडू ठरला. त्याने चार सामन्यात २०२ धावा केल्या.

१९ वर्षाआतील गटाचे आशिया चषक विजेते
१९८९- भारत
२००३- भारत
२०१२- भारत व पाकिस्तान (संयुक्त)
२०१४- भारत
२०१६- भारत
२०१७- अफगणिस्तान
२०१८- भारत
२०१९- भारत