राजकोट : दुसरा वन डे भारताने जिंकला

राजकोट : भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे झालेल्या दुसरा एकदिवसीय सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १ – १ असे बरोबरीत आहेत. अंतिम सामना बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर रविवारी १९ जानेवारीला होणार आहे.

पहिल्या सामन्यात मुंबई येथे १० गडयांनीं हारलेला भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरला. इथेही नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि आधी भारताला फलंदाजी दिली. रोहित शर्मा (४२) आणि शिखर धवन (९६) या सलामीच्या जोडीने पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. भारताला भारताला ३४० धावांपर्यंत पोहचवण्यात लोकेश राहुल (८०) आणि कर्णधार विराट कोहली (७८) यांनी चांगली साथ दिली. फलंदाजीच्या वेळी जायबंदी झालेला शिखर धवन क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी युजवेंद्र चहल आला होता. जायबंदी ऋषभ पंतच्या जागी मनीष पांडे तर शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली होती.

पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या सामन्यात झटपट बाद झाला. कर्णधार फिंच आणि स्मिथ यांनी छोटेखानी भागीदारी रचत भारताला झुंज दिली. मात्र रवीन्द्र जाडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन चिकाटीने खेळत होते. हे भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच लाबुशेन जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.