न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ४- १ ने जिंकली

India won 5th match

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतला अखेरचा सामना भारताने ३५ धावांनी जिंकला आणि मालिकाही ४ – १ ने जिंकली.

भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तोफखान्यापुढे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची फळी कोलमडली. १८ धावात धोनीपर्यंतचे ४ फलंदाज बाद झाले होते. भारत १०० – १५० धवांपर्यंत मजल मारेल की नाही अशी स्थिती असतांना अंबाती रायुडू (९०), विजय शंकर (४५) यांनी चिवटपणे खेळून डाव सावरला. शेवटच्या ठोकाठोकीत हार्दिक पंड्याने तुफान फटकेबाजी केली. २२ चेंडूंत पाच उत्तुंग षटकार आणि दोन चौकार हाणून ४५ धावा केल्या. भारताचा डाव ५० षटकात २५२ धावात संपला.

न्यूझीलंडची सुरुवातही चांगली झाली नाही. संघाची डावसंख्या १८ असतांना शामीने हेनरी निकोलसला बाद केले. नंतर विलियम्स ३९, लॅथमनं ३७, जेम्स निशामने ४४ धावा काढून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ५० शतकात न्यूझीलंड २१७ चाच पल्ला गाठू शकले.

एकदिवसीय ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले ३ सामने जिंकून भारताने मालिका जिंकली होती. चौथ्या सामन्यात भारत हारला होता. आज ५ व सामना जिंकून भारताने मालिका ४- १ ने जिंकली. ९० धावा काढणारा अंबाती रायुडू सामनावीर ठरला.