चेन्नईचा हिशेब चेन्नईतच बरोबर; भारताचा चौथ्याच दिवशी दणक्यात विजय

india england series 2021

भारताने (India) अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर (England) ३१७ धावांनी विजय मिळवला आणि चेन्नईतील हिशेब चेन्नईतच (Chennai) बरोबर केला. सामन्यात दीड दिवसांचा खेळ शिल्लक असतानाच आपण जिंकलो. पहिला सामना आपण २२७ धावांच्या फरकाने गमावला होता तर हा सामना त्यापेक्षाही मोठ्या फरकाने जिंकला. भारताचा धावांच्या हिशेबाने हा पाचवा सर्वांत मोठा विजय ठरला आहे. इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांत बाद केल्यावर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी १६४ धावांतच गुंडाळले. फिरकीपटू अक्षर पटेलने कसोटी पदार्पणातच ६० धावात ५ बळी मिळवले. रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पहिल्या डावातील ५ बळीनंतर ५३ धावांत ३ बळी मिळवले. कुलदीप यादवने २५ धावांत २ गडी बाद केले.

सामनावीर अर्थातच रविचंद्रन अश्विन ठरला. रोहित व अश्विनने मिळून या सामन्यात ३०६ धावा केल्या तर इंग्लंडच्या संघाने दोन्ही डावांत मिळून २९८ धावा केल्या. या प्रकारे या दोघांनीच तसे म्हटले तर इंग्लंडला हरवले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नवव्या क्रमांकावर आलेल्या मोईन अलीने १८ चेंडूंतच सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्यात ३ चौकार व ५ षटकार लगावले. कर्णधार जो रुटने ३३ धावा केल्या. सामनावीर पुरस्कार स्वीकारताना रविचंद्रन अश्विन म्हणाला की, पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्याची खेळपट्टी वेगळी होती आणि चेंडूपेक्षा मनाचेच खेळ अधिक चांगले आहेत.

फलंदाजी करताना मी रोहित शर्मा व विक्रम राठोड यांच्याशी चर्चा केली होती. कमजोर चेंडूंची वाट बघण्यापेक्षा चांगली फलंदाजी करून इंग्लिश गोलंदाजांना दबावात आणायचे मी ठरवले होते. स्वीपचा फायदा झाला. त्यानंतर मी सरावलो. अजिंक्य म्हणाला होता की, मी खूप विचार करतोय. सिडनीतील खेळीने माझ्यातील फलंदाज जागवला आहे. चेन्नईत मी शतक केले आणि ५ बळीसुद्धा घेतले. याचा आनंद आहे. दडपणात नव्हतो म्हणून गोलंदाजीसुद्धा चांगली झाली. अश्विनने तामिळमध्ये मनोगत व्यक्त केले तेव्हा चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. चेपाॕकच्या स्टँडसमध्ये बसून आपण वडिलांसोबत भरपूर क्रिकेट पाहिलेय. येथे खेळलेल्या माझ्या चार सामन्यांपैकी हा सर्वोत्तम आहे. कोविड -१९ च्या वातावरणातही भरपूर लोक सामना बघायला आले आणि त्यांनी आमचा विश्वास वाढवला. कर्णधार विराट कोहली म्हणाला की, मायदेशात प्रेक्षकांसमोर खेळताना वेगळाच अनुभव असतो. या सामन्यातील खेळ हा जिद्द व निर्धाराचे उत्तम उदाहरण होता.

चेन्नईतील प्रेक्षक फार जाणकार आणि क्रिकेटचे दर्दी आहेत, दोन्ही संघासाठी परिस्थिती आव्हानात्मक होती. पण आम्ही अधिक चिकाटी दाखवली, रुषभ पंत संघासाठी उपयुक्त ठरत आहे. वजन घटल्याने त्याची चपळाई वाढली आहे. अक्षर पटेलने पदार्पणात चांगली कामगिरी केली. आम्ही चुका दुरुस्त केल्या आहेत. लवकरात लवकर चुका दुरुस्त करणे हे पूर्वी होत नव्हते. पण आता आम्ही ते करतोय. अश्विनने जबरदस्त फलंदाजी केली आणि प्रेक्षकांचा उत्साह फारच जादू करणारा ठरला, असे भारतीय कर्णधाराने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER