भारत वि. ऑस्ट्रेलिया : खेळाची नव्हे तर खेळाडूंच्या दुखापतीची मालिका

खेळाची नव्हे तर खेळाडूंच्या दुखापतीची मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या क्रिकेट मालिकेचा मुहुर्त काही चांगला नव्हता असे दिसतेय. दोन्ही संघातील खेळाडूंना होणाऱ्या दुखापती पाहता असेच वाटायला लागले आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या भल्या मोठ्या यादीत आता सलामी फलंदाज यष्टीरक्षक के.एल. राहुलची भर पडली आहे. मनगट दुखावल्याने तो सिडनी येथील तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नसल्याची वार्ता आज सकाळीसकाळी येऊन धडकली आहे. मेलबोर्न (Melbourne) येथे शनिवारी सराव करताना त्याच्या मनगट मुरगळले आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान तीन आठवडे तरी लागतील असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तो आता मायदेशी परतेल आणि बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या दुखापतीवर उपचार होतील असे मंडळाने म्हटले आहे.

या दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेल्या किंवा दुखापतींमुळे अद्याप खेळू न शकलेल्या खेळाडूंची यादी फार मोठी आहे. उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व इशांत शर्मा (Ishant Sharma) आयपीएलपासून (IPL) दुखापतग्रस्त आहेत. इशांतची तर दुखापतीमुळे निवडच झाली नव्हती पण रोहितची कसोटी मालिकेसाठी निवड झाली असली तरी अद्याप तो खेळू शकलेला नाही. जलद गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) व उमेश यादव (Umesh Yadav) यांना दुखापतीने विश्रांती घेण्यास भाग पाडले आहे तर नियमीत कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर मायदेशी परतला आहे.

दरम्यान तिसऱ्या कसोटीसाठी सरावावेळी चेतेश्वर पुजारालासुध्दा (Cheteshwar Pujara) मार बसला होता पण सुदैवाने तो खेळू शकण्याच्या स्थितीत आहे.

भारतीय संघाने सरावासाठी सोबत नेलेल्या चार नेट गोलंदाजांपैकी इशांत पोरेल हासुध्दा वन डे मालिकेनंतर पायाच्या नडगीच्या दुखण्याने मायदेशी परतला आहे. नेट बोलर्सपैकी कमलेश नगरकोटी यानेसुध्दा फिटनेसच्या समस्येअभावी सुरुवातीलाच दौऱ्यावर जाणे टाळले होते. टी-20 संघात निवड झालेला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती हासुध्दा खांदेदुखीमुळे दौऱ्यावर गेला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी टी-20 संघात टी नटराजनला संधी मिळाली होती. वन डे संघातही नवदीप सैनीने पाठदुखीची तक्रार केली होती. त्याच्याही जागी टी नटराजनला संधी मिळाली होती तर आता उमेश यादवच्या जागीसुध्दा टी नटराजन कसोटी संघात आलाय.

याप्रकारे इशांत शर्मा, रोहित शर्मा, वरुण चक्रवर्ती, कमलेश नगरकोटी, इशान पोरेल, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, उमेश यादव आणि आता के.एल. राहुल अशी दुखापतग्रस्त झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंची यादी फार मोठी झाली आहे.

आॕस्ट्रेलियन संघालासुध्दा दुखापतींनी सतावलेले आहे. त्यांचा हुकूमी सलामी फलंदाज डेव्हिड वाॕर्नर, कन्कशन झाल्याने पदार्पणाची संधी मिळालेला विल पुकोवस्की, जसप्रीत बुमराचा चेंडू लागल्याने दुखापत झालेला कॕमेराॕन ग्रीन, पायाच्या दुखण्याने त्रासलेला सिन अबॉट अशी त्यांचीसुध्दा दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी मोठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER