व्वा टीम इंडिया व्वा! कम्माल केली!

India vs Australia won

कम्माल! अफलातून! अविश्वसनीय! हेच शब्द भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील (India Vs Australia) कामगिरीचे वर्णन करू शकतील; कारण ज्या संघाकडे धड ११ फिट खेळाडूसुद्धा जमवायची मारामार होती त्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर चारी मुंड्या चीत केले आणि मालिका (Test series) अविश्वसनीयरित्या २-१ अशी जिंकली. यासह ऑडिलेडमधील घसरगुंडीनंतर ही मालिका भारत ४-० अशी गमावेल अशा वल्गना करणारांना अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. भारताने सामना तीन गडी राखून जिंकला. आणि यासह जागतिक क्रमवारीतही आपण अव्वल स्थानी पोहचलो आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी घसरला.

कोहली, शामी, बुमरा, अश्विन, जडेजा, विहारी, यादव हे नसले तरी काही फरक नाही, फक्त १३ विकेट नावावर असणाऱ्या गोलंदाजांच्या संघाविरुद्ध १०४६ विकेट काढणारे गोलंदाज असले तरी काही फरक पडत नाही. जिद्द आणि इच्छा असली तर काहीही शक्य आहे हेच अजिंक्य रहाणे आणि टीमने दाखवून दिले.

भारताच्या या विजयाने ऑस्ट्रेलियाला केवळ जागतिक क्रमवारीतच तिसऱ्या स्थानी ढकलले असे नाही तर २००८ पासून सलग ९ मालिका आणि सलग १६ कसोटी सामने जिंकण्याचा त्यांचा विक्रम धुळीस मिळवला. ब्रिस्बेनच्या मैदानावर गेल्या ३१ सामन्यांत ऑस्ट्रेलियन हरलेले नव्हते, १९८८ पासूनची त्यांची या मैदानावरची ही कामगिरीसुद्धा जिद्दी आणि लढावू भारतीय संघाला रोखू शकली नाही.

ब्रिस्बेनच्या मैदानावर कोणत्याही संघाने चौथ्या डावात ३०० धावा केलेल्या नव्हत्या; पण भारतीय संघाने आज ७ बाद ३२९ धावा केल्या. याचे श्रेय शुभमन गीलच्या ९१, चेतेश्वर पुजाराच्या ५६ आणि रिषभ पंतच्या ८९ धावांना… शिवाय सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात पंत व वाॕशिंग्टन सुंदर (२२) यांनी केलेली सहाव्या गड्याची ५३ धावांची भागीदारीसुद्धा महत्त्वाची ठरली.

त्यामुळे वुलन गाबाच्या खेळपट्टीवर शेवटच्या डावात ३०० धावा होऊ शकत नाही हा भ्रम असल्याचे टीम इंडियाने सिद्ध केले आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या संघात भारतीय संघ चौथ्या स्थानी जाऊन बसला. टीम इंडियाने आज ३२५ धावा केल्या. यापेक्षा अधिक धावा ऑस्ट्रेलियाने ४०४ (वि. इंग्लंड १९४८), वेस्ट इंडीजने ३४८ (वि. न्यूझिलंड १९६९) आणि वेस्ट इंडिजनेच ३४४ (वि. इंग्लंड १९८४) केलेल्या होत्या.

ऑस्ट्रेलियात सामना जिंकण्यासाठी यशस्वी पाठलाग केलेली ही तिसरी मोठी (७ बाद ३२७) धावसंख्या ठरली. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने ४१४ धावा केल्या होत्या आणि १९२८ मध्ये इंग्लंडने ३३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या आजच्या ७ बाद ३२९ धावा.

शेवटच्या दिवशी भारतासाठी ठरल्याप्रमाणेच घडून आले. पुजाराने नेहमीप्रमाणेच नांगर टाकून अर्धा दिवस खेळून काढला. शुभमान गील व रिषभ पंत यांनी आवश्यक धावगती कायम ठेवली. नंतर वाॕशिंग्टन सुंदरने पंतला अतिशय मोलाची साथ दिली आणि भारताने जादू घडवली.

९७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हेजलवूडला रिषभ पंतने चौकार लगावला आणि डेव्हिड आणि गोलियथच्या या लढाईत डेव्हीड असलेला भारतीय संघ जिंकला. येणारी बरीच वर्षे कुणीही हा विजय आणि ही मालिका विसरू शकणार नाही; कारण १९८३ नंतर भारतीय संघाने पहिल्यांदाच असा चमत्कार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER