India vs England: चेन्नईत भारताला पराभूत करणे कठीण, आकडेवारी ब्रिटिशविरूद्ध

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला आणि दुसरा सामना चेन्नईच्या चेपॅक मैदानावर खेळला जाईल. या मैदानावर टीम इंडियाचा वरचष्मा असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ऐतिहासिक मैदानावर भारताच्या विजयाची पुष्टी का होत आहे हे जाणून घेऊया.

१. चेन्नईत भारत विरुद्ध इंग्लंड

चेन्नईच्या एमएम चिदंबरम स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड ९ वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने ५ तर इंग्लंडने ३ वेळा विजय मिळविला होता, तर एक सामना अनिर्णित राहिला. अशा परिस्थितीत या मैदानावर भारताला पराभूत करणे फार अवघड आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

२. इंग्लिश टीमचा पहिला भारत दौरा

१९३४ मध्ये ब्रिटिश भारताचा कर्णधार सीके नायडू असताना इंग्लंडची टीम प्रथमच भारतात आली होती. ३ सामन्यांच्या मालिकेची तिसरी आणि शेवटची कसोटी चेन्नई येथे खेळली गेली. या सामन्यात इंग्लंडने २०२ धावांनी विजय मिळविला. यासह मालिका २-० ने जिंकली होती.

३. गेल्या वेळी काय झाले होते?

इंग्लंडचा संघ सन २०१६ मध्ये भारत दौर्‍यावर आला होता, जेव्हा टीम इंडियाने ब्रिटीशांना ४-० ने हरवून मालिका जिंकली होती. मालिकेचा ५ वा सामना चेन्नई येथे खेळला गेला होता. त्या काळात विराट कोहलीच्या सैन्याने एलिस्टर कुकच्या सैन्याला डाव आणि ७५ धावांनी पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४७७ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून केएल राहुलने १९९ आणि करुण नायरने तिहेरी शतकी खेळी (३०३) केली होती. भारताने आपला पहिला डाव ७५९/७ वर घोषित केला. त्यानंतर रवींद्र जडेजाने ७ गडी बाद केले आणि इंग्लंडची संपूर्ण खेळी २०७ धावांवर बाद झाली.

४. ३० वर्षांचा दुष्काळ संपवेल इंग्लंड

इंग्लंडने चेपॉक मैदानावर मागील ३० वर्षांपासून एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. जो रूटला हा दीर्घकाळ दुष्काळ संपवायचा आहे, परंतु हे त्याच्यासाठी सोपे जाणार नाही.

५. भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये कोण पुढे?

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १२२ कसोटी सामने खेळले गेले आहेत. इंग्लंडने ४७ आणि टीम इंडियाने २६ वेळा विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये ४९ कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. हा विक्रम इंग्लंडच्या बाजूने असू शकतो, पण घरच्या मैदानावर भारताचे वर्चस्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER