भारताची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर

नवी दिल्ली : भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश ठरला आहे. अमेरिकन थिंक टँक वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या २०१९ च्या अहवाल हि माहिती आहे.

अहवालानुसार भारताचा जीडीपी गेल्यावर्षी २. ९४ लाख कोटी डॉलर (२०९ लाख कोटी रुपये) आहे. ब्रिटन २. ८३ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था – सहाव्या आणि फ्रान्स २. ७१ लाख कोटी डॉलर सातव्या क्रमांकावर आहेत. २०१८ मध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता आणि ब्रिटन पाचव्या व फ्रान्स सहाव्या क्रमांकावर होता.

भारत आता खुल्या बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेत स्वतःला विकसित करत आहे. भारतात १९९० च्या दशकात आर्थिक उदारीकरण सुरू झाले होते. त्यावेळी उद्योगांवर नियंत्रण कमी होते. परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीला सूट देण्यात आली आणि सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरू झाले. यामुळे भारताच्या आर्थिक विकास दराचा वेग वाढला. वर्ल्ड पॉपुलेशन रिव्ह्यूच्या मते, भारताचे सेवा क्षेत्र जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे ६० आणि रोजगारात २८ टक्के योगदान आहे. उत्पादन आणि शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेची महत्त्वपूर्ण क्षेत्रे आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

जीडीपीची ५ टक्के राहण्याचा अंदाज

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार चालू आर्थिक वर्षात (२०१९ – २०) भारताचा जीडीपी वृद्धीचा दर ५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. हा गेल्या ११ वर्षांतील सर्वाधिक कमी वृद्धी असेल. ३१ जानेवारी रोजी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातही हा दर ५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

सर्वेक्षणात म्हटले आहे की जागतिक मंदीचा भारतावरही परिणाम होतो आहे. आर्थिक क्षेत्रातील अडचणींमुळे गुंतवणूकीअभावी चालू आर्थिक वर्षातील वाढ कमी झाली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून वृद्धी दर वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलर (३५५ लाख कोटी रुपये) अर्थव्यवस्थेपर्यंत झेप घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.