भारतीय संघ आता मोजक्याच खेळाडूंवर अवलंबून नाही : हरमनप्रीत

Harmanpreet
  • ऑस्ट्रेलियावरील खणखणीत विजयानंतर प्रतिक्रिया
  • पूनम राऊत, जेमिमा रॉड्रीक्स व दीप्ती शर्माच्या कामगिरीचे केले कौतूक
  • भारतीय गोलंदाजांकडून एकही ‘वाईड’ नाही

सिडनी :- भारतीय संघ आधी मोजक्याच दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून असलेला दिसायचा पण आता तसे राहिलेले नाही, असे टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सुरूवात करणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने म्हटले आहे. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्याच मैदानावर १७ धावांनी मात देण्याचे श्रेय तिने जेमिमा रॉड्रीक्स व दीप्ती शर्मा यांच्या ५३ धावांच्या भागीदारीला आणि पूनम राऊतच्या प्रभावी गोलंदाजीला दिले आहे.

ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेटच्या सामन्याला विक्रमी १३ हजार ४३२ प्रेक्षकांची उपस्थिती लाभलेला हा सामना जिंकल्यानंतर ती बोलत होती. हरमनप्रीत म्हणाली, शोग्राऊंड स्टेडियमच्या या खेळपट्टीवर १४० धावा गोलंदाजांना रक्षण करण्यासाठी पुरेशा ठरतील असा अंदाज होताच. कारण या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती. पूनम राऊतकडून असेच धडाकेबाज पुनरागमन आम्ही अपेक्षित करत होतो. संघाची सुरुवात तर चांगली झाली आहे आणि आजचा खेळ बघून संघ चांगला तयार झाल्याचे दिसतेय.

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सात सामन्यात दुसºयांदा भारताकडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार मेन लॅनिंग म्हणाली, १३३ धावांचे लक्ष्य मिळाले तेंव्हा आम्हाला बरे वाटले होते कारण चेंडू एकसमान उसळत होता आणि सरळ खेळण्याची गरज होती पण आमची एकही भागीदारी होऊ शकली नाही. भारतीय गोलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट मारा केला आणि ते खरोखरच विजयाचे हक्कदार आहेत.

१९ धावात ४ बळी मिळवून सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली पूनम राऊत हिने दुखापतीतून सावरत आपण ही विजयी कामगिरी करू शकलो यासाठी सहकारी खेळाडू, कुटुंबिय, मित्र आणि फिजिओथेरपीस्ट यांना धन्यवाद दिले आहेत.

राचेल हेस व एलिस पेरी यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केल्यानंतर हुकलेल्या हॅटट्रीकबद्दल ती म्हणाली की, तिसऱ्यांदा माझी हॅट्ट्रीक हुकली आहे. पण भविष्यात कधीतरी हॅटट्रीक नावावर लागेल याबद्दल ती आशावादी आहे. यष्टीरक्षण भाटियाने जेस जोनासनचा झेल घेतला असता तर तिची हॅटट्रीक झाली असती पण तो अवघड झेल घेता आला नाही.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी काही वाईट फटके मारुन गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीवर पाणी फेरल्याचे मत समिक्षकांनी व्यक्त केले आहे.

या सामन्याची वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे भारतीय गोलंदाजांनी अगदी योग्य दिशा व टप्पा राखून मारा केला. त्यामुळे सामन्यात त्यांनी फक्त दोन अवांतर धावा दिल्या. त्यात एकही चेंडू वाईड नव्हता आणि नो बॉलसुध्दा एकच होता.

महिला टी-२० विश्वचषक; पहिल्या सामन्यात भारत विजयी