मायदेशात सलग अकरा मालिका जिंकणारा भारत पहिला संघ

india-made-history-break-australias-record-and-won-11-consecutive-test-series

पुणे : भारतीय संघाने एक नवीन विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळविताच मायदेशात सलग अकरा मालिका जिंकणारा भारत जगात पहिला संघ ठरला आहे.

विराट कोहलीच्या टीम इंडियाने पुणे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. कसोटी इतिहासात मायदेशात सलग अकरा मालिका जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे. 2012 पासून आतापर्यंत भारतीय भूमीवर झालेल्या कसोटी मालिकांमध्ये टीम इंडिया अपराजित राहिली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा सलग दहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खिशात घालत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा तो विक्रम मोडीत काढला आहे.

पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी धुव्वा उडवून सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात 326 धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर खेळतानाही भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजी पुन्हा ढेपाळली आणि पाहुण्या संघाचा दुसरा डाव 189 धावांतच आटोपला. भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जाडेजाने सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडले. अश्विनने दोन तर ईशांत शर्मा आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताने हि मालिका जिकताच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटीकडे लक्ष आहे.