चेन्नई कसोटी भारताने गमावली

कोहलीच्या नेतृत्वात सलग चौथा पराभव

ऑस्ट्रेलियाला मात देणाऱ्या भारतीय संघाला घरच्या मैदानावर मात्र इंग्लंडविरुध्दचा (India Vs England) सामना वाचविण्यात अपयश आले आहे. चेन्नई (Chennai) येथील पहिला कसोटी सामना मंगळवारी भारताने 227 धावांनी गमावला. 420 धावांचे लक्ष्य असताना भारतीय संघाचा दुसरा डाव 192 धावात आटोपला. यासह चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

कसोटी संघाचा नियमीत कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) परतल्यावर भारताने पुन्हा पराभव पत्करला आहे. कोहलीचा याच्याआधीचा सामना अॕडिलेड येथेही भारताने गमावला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने मागचे चार कसोटी सामने गमावले आहेत. दूसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा (Joe Root) आशियातील सहा सामन्यांतला हा सहावा विजय आहे.

विराटने पराभव टाळण्यासाठी आज प्रयत्नांची शिकस्त केली. त्याने अडीच तास एक बाजू लावून धरताना 72 धावा केल्या पण दुसऱ्या टोकाला पाय रोवून खेळणारा साथीदार न मिळाल्याने सामना वाचविण्यात त्याला अपयश आला.

भारतात खेळल्या गेलेल्या मागच्या 50 कसोटी सामन्यांतला भारताचा हा केवळ पाचवा पराभव आहे. याच्याआधी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्दची नागपूर कसोटी, इंग्लंडविरुध्दची 2012 ची मुंबई कसोटी, त्याच वर्षी इंग्लंडविरुध्दची कोलकाता कसोटी आणि 2017 मध्ये आॕस्ट्रेलियाविरुध्दची पूणे कसोटी भारताने गमावली होती. गेल्या 10 वर्षात भारताने मायदेशी इंग्लंडविरुध्द तीन आणि आॕस्ट्रेलियाविरुध्द एक कसोटी सामना गमावला आहे.

भारताची धावसंख्या 179 असताना बेन स्टोक्सने विराट कोहलीचा त्रीफळा उडवला आणि भारताचा प्रतिकार अडवला. त्याआधी उपाहाराआधी जेम्स अँडरसनने तीन गडी बाद करुन भारताला अडचणीत आले होते. आजच्या आपल्या पहिल्याच षटकात दोन गडी बाद करुन त्याने इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. अँडरसनने 17 धावात तीन गडी बाद केले तर जॕक लीचने 76 धावात चार गडी बाद केले.

ही बातमी पण वाचा : काय आहे रविचंद्रन अश्विनचा ‘फर्स्ट टू लास्ट’ चा खासमखास विक्रम?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER