भारत धर्मशाळा नाही, जिथे…, रोहिंग्याबाबत अनिल वीज यांनी सुनावले

Anil Vij

चंदीगड : राज्यात आश्रय घेणाऱ्या रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींबाबत माहिती एकत्र करणे सुरू आहे. भारत धर्मशाळा नाही, जिथे कुणीही येऊन राहावे, असे विधान हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज (Anil Vij) यांनी केले.

जम्मूमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या १६८ रोहिंग्यांना तुरुंगात धाडण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती नुकतीच अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर अनिल वीज यांनी रोहिंग्या शरणार्थींबाबत उल्लेखित विधान केले. गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. हरयाणाच्या मेवातमध्येही रोहिंग्या नागरिक आहेत, अशी प्रशासनाची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींविरोधात ‘बनावट’ पासपोर्ट मिळवून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूत राहणाऱ्या रोहिंग्या समुदायातील लोकांची ओळख पटवणे सुरू आहे. याचवेळी दोन रोहिंग्या व्यक्तींकडे बनावट पासपोर्ट आढळून आला होता. रहमान आणि गफूर नावाच्या या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी अहवालानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये १३ हजार ६०० नागरिक अवैधरित्या राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील बहुतांश रोहिंग्या असल्याचे कळते. रोहिंगे आम्हाला त्रास देत नाहीत, मात्र ते भारतात आलेच कसे याचा शोध आवश्यक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं तर इतर देशांतून नागरिक इकडे येत असतील, तर आपल्या सीमा सुरक्षित आहेत काय, असा सवाल उपस्थित होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER