रहाणेच्या नेतृत्वाने पाडला प्रभाव, दिग्गजांनी केली प्रशंसा

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या (India Vs Australia) दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी मेलबोर्न (Melbourne) येथे भारताने वर्चस्व गाजवले. उत्तम गोलंदाजी व उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांतच संपवला आणि दिवसअखेर मयांक अगरवालला गमावून 36 धावासुध्दा केल्या. याप्रकारे पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व गाजवतानाच विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वानेही (Captaincy) प्रभाव पाडला. बहुतेक माजी क्रिकेटपटूंनी रहाणेच्या कप्तानीची प्रशंसा केली आहे. विशेषतः ज्या पध्दतीने त्याने रविचंद्रन अश्विनचा (R. Ashwin) उपयोग करुन घेतला त्याने सर्वच प्रभावीत झाले आणि कसोटी क्रिकेटसाठी भारताला नेतृत्वासाठी चांगला पर्याय मिळाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बुमराने चार तर अश्विनने तीन गडी बाद केले.

विशेष म्हणजे अॕडिलेड कसोटीत अवघ्या 36 धावात बाद झाल्यानंतरच्या लाजिरवाण्या पराभवानंतर ते अपयश विसरुन भारतीय संघ नव्या उमेदीने खेळताना दिसला. रहाणेने ज्या पध्दतीने डावात लवकरच म्हणजे अगदी 11 व्या षटकातच अश्विनच्या हाती चेंडू सोपवला त्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले. त्याचा हा डाव चांगलाच यशस्वी ठरला कारण अश्विनने मॕथ्थ्यू वेडला 30 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथला तर शून्यावरच बाद केले. याशिवाय त्याने केलेली क्षेत्ररचना व दाखवलेली लढावू वृत्ती प्रभावीत करुन गेली.

दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॕकग्राने समालोचन करताना म्हटले की रहाणेने चांगल्याप्रकारे जबाबदारी उचलली आहे. त्याने गोलंदाजांना विश्वास दिला आहे, एका वेळी त्याने चार स्लीप व गली असे क्षेत्ररक्षण लावले. स्मिथ फलंदाजीला आल्यावर बुमराला गोलंदाजी देऊन त्याने दबाव वाढवला. त्याचे नेतृत्व माझ्या मते फार चांगले आहे.

अजय जडेजा याने म्हटलेय की तो बुमरासोबत आक्रमण सुरु करेल हे साहजिक होते पण अश्विनने स्मीथला काढल्यावरही त्याने दबाव कायम ठेवला. सहसा भारतीय गोलंदाजीत एक ठराविक पध्दत दिसते पण आज तसे नव्हते. सामन्याच्या पहिल्या दिवशी सहसा फिरकी गोलंदाजांचा एवढा वापर केला जात नाही. विशेष म्हणजे दोन्ही बाजुंनी त्याने फिरकी गोलंदाज लावले आणि त्यात तो यशस्वी ठरला.

बिशनसिंग बेदी यांनीसुध्दा ज्याप्रकारे फिरकी गोलंदाजांचा वापर केला त्याने प्रभावित केल्याचे म्हटले आहे. त्याच्या नेतृत्वाने कसोटी क्रिकेट जिवंत व गुंतवून ठेवणारे असल्याची अनुभूती आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

माजी कसोटीपटू पार्थिव पटेलही प्रभावीत होऊन म्हणाला की ज्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर खेळून रहाणे समोर आलाय, मेलबोर्नची खेळपट्टी साधारण तशीच आहे. मुंबईकर नेहमीच खेळपट्टीतील ओलाव्याचा फायदा घेण्यासाठी फिरकी गोलंदाज लवकर लावतात. रहाणेला तोच अनुभव कामी आला. अश्विनला दोन षटकानंतर तो बदलू शकला असता पण त्याने वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी अश्विनचा चांगला उपयोग करुन घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER