बलाढ्य अमेरिकेला चकवा देत भारतानं मिळवली अणूशक्तीची ताकद !

Maharashtra Today

भारतानं १९९८ ला अमेरिकेच्या उपग्रहाची नजर चुकवत ५ परमाणू चाचण्या केल्या होत्या. या परिक्षणाची कानोकान खबर अमेरिका, जर्मनी, इंग्लंडसारख्या युरोपीयन देशांच्या गुप्तहेर संघटनांनाही याची कल्पना नव्हती. जगातल्या सर्वात सिक्रेट ऑपरेशन्समध्ये या परिक्षणाची गणती केली जाते. अमेरिकेची सी.आय,ए. सारख्या चालाख संस्थेला चकवा देत या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या.

पाच अणू चाचण्या करण्यात आल्या…

११ मे १९९८च्या दुपारी ३ वाजून ४५ मिनीटाला एकाच वेळी तीन परमाणू स्फोट झाले. तोपर्यंत जगाला याची खबर नव्हती. अमेरिका आणि चीन सारखी बलाढ्य राष्टांचा या घटनेचा अंदाज आला नव्हता. आता वेळ होती भारताची ताकद जगाला दाखवायची. दोन तासांनंतर तत्कालीन पंतधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) माध्यमांसोर येऊन परमाणू चाचणीबद्दलची जगाला माहिती दिली.

यानंतर लगचे ४५ तासांनी १३ मे ला दुसऱ्यांचा पोखरणमध्ये दोनच सब कलोजन डिव्हायसेसची सफलापूर्ण चाचणी करण्यात आली होती. ११-१३ मे दरम्यान झालेल्या एकूण पाच परमाणू चाचण्यांनी भारताचं स्थान शक्तीशाली देशांच्या यादीत पक्क केलं.

लॅक्रोस उपग्रहाची होती पोखरणवर नजर

याआधी भारतानं १९९५ साली परमाणू चाचणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिकेन उपग्रहाच्या नजरेत ही चाचणी आल्यानं तीला रद्द करावं लागलं होतं. १९९८ ला वाजपेयींच्या नेतृत्त्वात बनलेल्या सरकारनं भारताला परमाणू संपन्न राष्ट्र बनवण्याची घोषणा केली. हे विधान ऐकून अमेरिकेच्या गुप्तहेर संघटानांनी कान टवकारले. १९९५ पासूनच पोखरणवरील निगराणी वाढवण्यात आली होती. पोखरणच्या गस्तीसाठी अमेरिकेने उपग्रहांची मदत घेतली होती. तसेच अमेरिकेची नॅशनल इमेजनरी अँड मॅपिंग एजेन्सी (एन.आय.एम.ए) आणि नॅशनल जियोस्पाटियल इंटेलिजन्स एजेन्सी (एन.जी.ए.) यांची स्थापना करण्यात आली. १९९८ साली अमेरिकेच्या सी.आय.ए. या गुप्तहेर संघटनेकडे काही उपग्रह होते. त्यांच्या क्षमता इतक्या जास्त होत्या की अवकाशातून जमिनीवरील एखाद्या माणसाच्या हातातली घडाळाची वेळही त्यांना पाहता यायची.

पोखरणवर नजर ठेऊन असणाऱ्या लॅक्रोस उपग्रहाची क्षमता धुळ आणि ढगाला छेदून पोखरणचे फोटो घेण्या इतपत होती. या उपग्रहाद्वारे घेतलेले फोटो दुसऱ्या क्षणाला तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या टेबलपर्यंत पोहचवले जायचे.

भारतानं असा दिला चकवा

भारतीय वैज्ञानिकांनी उपग्रहांच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांच्या वेळेची माहिती घेतली. पोखरणच्या वाळवंटी प्रदेशावर दिवसभरातल्या कोणत्या वेळात उपग्रहांकडून गस्त घातली जाते. याची माहिती काढण्यात आली. जेव्हा ही पोखरणच्या वाळवंटावरुन उपग्रहांची नजर हटायची तेंव्हा वैज्ञानिक काम सुरु करायचे आणि अमेरिकेचे उपग्रह गस्त घालायला लागले की काम बंद केलं जायचं. अमेरिकेची पोखरणवर असणारी गरुड नजर अणू चाचणीसाठी मोठा अडसर होती पण भारतीय वैज्ञानिकांनी वेळाचा योग्य वापर करत भारतीय वैज्ञानिकांनी अशक्य वाटणारी पोखरणची परमाणू चाचणी करुन दाखवली.

दशकातली सर्वात मोठी गुप्तहेरीतलं अपयश

अमेरिकेची बंधनं झुकारुन भारतानं परमाणू चाचणी यशस्वी करुन दाखवली. अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयए आणि अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच ते अपयश होतं. या परिक्षणानंतर अमेरिकेच्या संसदेत याचे पडसाद उमटले. अमेरिकेच्या सिनेटमधील गुप्तहेर विभागाच्या अध्यक्षांनी या घटनलेला ‘दशकातलं सर्वात मोठं गुप्तहेरीतलं अपयश’ या शब्दात अमेरिकेच्या अपयशाची निंदा केली. गुप्तहेर खात्याच्या या अपयशासाठी कारणीभूत अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.

पोखरणची चाचणी ‘ऑपरेशन शक्ती’ या नावानं ओळखली जाते. अमेरिकेसह इतर अनेक देशांनी परमाणू चाचणी केल्याप्रकरणी भारतावर कठोर दंडात्मक आर्थिक, औद्योगिक, प्रतिबंध लादले. पोखरण परमाणू चाचणीनंतर भारतानं प्रचंड परमाणू शक्ती कमावलीये. अमेरिका, चीन, रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रांच्या यादीत आता भारताचाही समावेश आहे. आणि हे शक्य झालं, पोखरणच्या अणूउर्जा चाचणीमुळं.