भारतीय संघाने अ‍ॅडिलेड कसोटी सुरू होण्याआधीच केलाय कोणता ‘अनोखा’ विक्रम?

IND vs AUS 2020 Adelaide Oval

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India Vs Australia) अ‍ॅडिलेड ओव्हलवर (Adelaide Oval) आज (17 डिसेंबर) सुरु झालेला पहिला कसोटी सामना (Test Match) हा भारतासाठी अतीविशेष आहे. असे सामने नेहमी नेहमी खेळले जात नाहीत आणि खेळ सुरु होण्याआधीच हा सामना विशेष ठरला आहे. तो कसा काय? तर या सामन्यातील भारतीय संघ (प्लेईंग इलेव्हन) जर पाहिला तर सर्वच्या सर्व 11 खेळाडू उजव्या हाताने खेळणारे आहेत. एकही डावखुरा नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे.

याआधी शेवटचा असा कसोटी सामना ज्यात एका संघाचे सर्वच्या सर्व खेळाडू उजवे होते तो शारजात 2015 साली खेळला गेला होता. इंग्लंडविरुध्दच्या त्या सामन्यात पाकिस्तानचे सर्व खेळाडू उजव्या हाताने खेळणारे होते.

भारतीय संघाबद्दल बोलायचे तर 2015 मध्येच कोलंबोत भारताने श्रीलंकेविरुध्द जो सामना खेळला होता त्यात आपले 11 च्या 11 खेळाडू राईट हँडर होते आणि ऑस्ट्रेलियात याआधी पूर्णपणे उजव्या खेळाडूंचा भारतीय संघ 1992 च्या पर्थ कसोटीत खेळला होता. म्हणजे तब्बल 28 वर्षानंतर प्रथमच भारताचा 11 च्या 11 खेळाडू उजवे असणारा संघ ऑस्ट्रेलियात खेळतोय.

मात्र भारताशिवाय इतर काही पूर्ण उजवे संघ 1992 नंतरही ऑस्ट्रेलियात कसोटी खेळले आहेत. बांगलादेशचा संघ हा असा शेवटचा संघ होता. त्यांनी 2003 मधील केर्न्स कसोटीत पूर्ण राईट हँडर खेळाडूंचा संघ उतरवला होता.

पूर्णपणे उजव्या खेळाडूंचा संघ असला तरी ऑस्ट्रेलियात त्यांच्या बाजूने उजवा निकाल मात्र गेल्या 68 वर्षात लागलेला नाही. फार पूर्वी म्हणजे 1952 मध्ये दक्षिण आफ्रिकन संघाने मेलबोर्न कसोटी जिंकली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे उजव्या खेळाडूंचा होता. त्यानंतर मात्र संघ उजव्या खेळाडूंचा असला तरी निकाल मात्र डावाच राहिला होता. आता विराट कोहलीचा उजवा संघ निकालही उजवा लागू शकला तर 68 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरलेला तो पहिलाच उजवा संघ ठरेल.

ज्याप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये उजव्या खेळाडूंच्या प्लेईंग ईलेव्हन खेळल्या आहेत.त्याप्रमाणे लेफ्टी खेळाडूंची मात्र आतापर्यंत एकही प्लेईंग इलेव्हन कसोटी सामना खेळलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER