लडाखमधील तणाव मिटणार, भारत-चीनचं ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती

Jaishankar - Wang

नवी दिल्ली : चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर आलेले भारत (India) आणि चीनचे (China) सैन्य यामुळे लडाखमध्ये (Ladakh) निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.

सीमेवर सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवरी सैनिकांना हटवण्यासंदर्भात एस.जयशंकर आणि वांग यी यांच्यादरम्यान गुरूवारी बैठक पार पडली. दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध विकसित करण्यासाठी नेत्यांच्या सहमतीवरून मार्गदर्शन घ्याव आणि दोन्ही देशांतील मतभेदांचं रूपांतर वादात होऊ नये, असंही या बैठकीत ठरवण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयतर्फे सांगण्यात आलं.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये सांगण्यात आले की, दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि चीनच्या सीमाभागासोबतच भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवर स्पष्ट आणि रचनात्मक चर्चा केली. परस्पर संवाद चालू राहिला पाहिजे. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैनिकांना लवकरात लवकर मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली पाहिजे, यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. योग्य अंतर राखून तणाव कमी करण्याच्या दिशेने काम केले पाहिजे, असेही या चर्चेत निश्चित झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER