दुसऱ्याच दिवशीच्या झटपट विजयाने भारत वर्ल्डफायनलमध्ये, इंग्लंडचा पत्ता कट

India

कसोटी सामने हे पाच दिवसांचे असतात हे सांगावे लागण्याची वेळ आता आली आहे कारण पूर्णवेळ कसोटी सामना होण्याचे दिवस आता जवळपास इतिहासजमा झाले आहेत. इंग्लंडविरुध्दचा (India Vs England) दुसरा कसोटी सामना भारताने चौथ्या दिवशी जिंकला होता आणि आता तिसरा कसोटी सामना अहमदाबादला (Ahmedabad). तर दुसऱ्याच दिवशी जिंकला आहे. तोसुध्दा एकही गडी न गमावता.

सामन्यात अक्षर पटेलच्या 11 विकेट आणि रवीचंद्रन अश्विनच्या 7 विकेट आणि या दोघांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ असा काही अडकला की, 112 व 81 धावातच ते बाद झाले आणि विजयासाठी मिळालेले 49 धावांचे लक्ष्य भारताने दुसऱ्याच दिवशी गाठले. रोहित शर्मा (नाबाद 25) व शुभमन गिल (नाबाद 15) यांनी 7.4 षटकांतच भारताचा विजय साजरा केला.

या विजयाने भारताला कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत टाॕपला तर पोहचवलेच शिवाय इंग्लंडला अंतिम फेरीच्या शक्यतेतून बाद केले. आता कसोटी क्रिकेटच्या जगज्जेतेपदासाठी भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल हे जवळपास निश्चित आहे.

अहमदाबादचा सामना फक्त 140.2 षटकात आटोपला. त्यामुळे भारताचा हा सर्वात झटपट कसोटी सामना ठरला यात आश्चर्याची बाब नाही. याच्याआधी 2019 मध्ये बांगलादेशविरुध्दचा ईडन गार्डनवरचा सामना आपण 161.2 षटकात जिंकला होता. त्याच्यापेक्षाही 21 षटके यावेळी कमी लागली. आणि 2018 मध्ये अफगणिस्तानला आपण दोनच दिवसात हरवले होते त्यांनतरचा टीम इंडियाचा दोनच दिवसातला हा पहिलाच विजय ठरला. पण त्यावेळचा प्रतिस्पर्धी अफगाणसारखा नवखा संघ होता आणि यावेळचा संघ इंग्लंडचा आहे हा मोठा फरक आहे.

दोन प्रमुख संघात केवळ दोनच दिवसात आटोपलेला याच्याआधीचा शेवटचा सामना 2002 मध्ये शारजात पाकिस्तान व आॕस्ट्रेलियादरम्यान खेळला गेला होता.

योगायोग पहा, भारताने आतापर्यंत जे तीन डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी एकही चौथ्या दिवसापर्यंत गेलेला नाही. बांगलादेश व आॕस्ट्रेलियाविरुध्दचे गुलाबी चेंडूचे सामने तिसऱ्याच दिवशी संपले होते. यावेळी तर तिसरा दिवसही उगवला नाही. हा सामना जो 140.2 षटकांत आटोपला तो दुसऱ्या विश्वयुध्दानंतरचा सर्वात झटपट आटोपलेला कसोटी सामना आहे.

कमीत कमी चेंडूत आटोपलेले कसोटी सामने

  • 656 – आॕस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका- 1931-32
  • 672 – वेस्ट इंडिज वि. इंग्लंड – 1934-35
  • 788 – इंग्लंड वि. आॕस्ट्रेलिया – 1888 (मँचेस्टर)
  • 792 – इंग्लंड वि. आॕस्ट्रेलिया – 1888 (लाॕर्डस्)
  • 796 – द. आफ्रिका वि. इंग्लंड – 1888-89
  • 815 – इंग्लंड वि. द. आफ्रिका – 1912
  • 842 – भारत वि. इंग्लंड – 2021 (अहमदाबाद)
  • 872 – न्यूझीलंड वि. आॕस्ट्रेलिया – 1945/46
  • 883 – द. आफ्रिका वि. इंग्लंड – 1999-00
  • 893 – आॕस्ट्रेलिया वि. पाकिस्तान – 2002 – 03

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER