भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळातील ताणाताणीने ब्रिस्बेन कसोटी धोक्यात

Rohit Sharma

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघातील (India Vs Australia) पाच खेळाडूंना कोरोना जैव सुरक्षा (Bio Bubble) नियमावली भंग केल्याबद्दल विलगीकरणात ठेवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळादरम्यानचे मतभेद अधिक गहिरे झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी नियमांचा भंग केल्याचा इन्कार तर केला आहेच, शिवाय आता क्वीन्सलँडमध्ये (Queensland) भारतीय संघावर अधिक कठोर क्वारंटाईन (Quarantine) नियमावली लादली जाण्याची शक्यता बघून भारतीय संघाने चौथी कसोटी ब्रिस्बेन येथे खेळण्यास असहमती दर्शवली आहे. त्यामुळे क्वीन्सलँडमधील ब्रिस्बेन येथे असलेला चौथा कसोटी सामना धोक्यात आला आहे. भारतीय मंडळाने तिसरी व चौथी कसोटी सिडनी येथेच खळविण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंनी केलेल्या नियमभंगाची चौकशी सुरु झाली आहे.

सद्यस्थितीत संघांना क्वारंटाईन नियमावलीत काही सवलती देण्यात आल्या आहेत. जसे की ते हॉटेलच्या बाहेर पडू शकतात आणि बाहेर खुल्या मोकळ्या जागेत खाऊपिऊ शकतात. मात्र आता भारतीय खेळाडूंच्या रेस्टारंटमधील पार्टी प्रकरणानंतर त्यात बदल होण्याची शक्यता आहे. सिडनीत कडक निर्बंध राहण्याची शक्यता आहे तर क्रिकेट आॕस्ट्रेलियाचे निक हाॕकली यांनी म्हटल्यानुसार ब्रिस्बेन कसोटी कडक क्वारंटीन नियमांतर्गत खेळली जाईल. याचा अर्थ संघ केवळ सराव व खेळण्यासाठीच हाॕटेलबाहेर पडू शकतील. सद्यस्थितीत सिडनी व क्विन्सलँडदरम्यानची सीमा बंद आहे.

असे कडक निर्बंध आल्यास भारतीय संघव्यवस्थापनाने चिंता व्यक्त केली आहे. केवळ हाॕटेलातच अडकून रहायचे असेल तर आम्ही ब्रिस्बेनला जाण्यास उत्सुक नाही. त्यापेक्षा इतर कोणत्याही शहरात सामना खेळून मालिका संपवायला आम्हाला आवडेल अशी भूमिका भारतीय संघव्यवस्थापनाची असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, रेस्टारंटमध्ये गेल्याने पाच भारतीय क्रिकेटपटूंच्या मुद्द्यावर भारतीय संघ व्यवस्थापनाची भूमिका अशी असल्याचे समजते की, त्यांनी आॕस्ट्रेलियातआल्यावर 14 दिवसांच्या क्वारंटीनची अट पूर्ण केलेली असल्याने त्यांना सामान्य नागरिकांचेच नियम व अटी लागू व्हायला हव्यात. परंतु सद्यस्थितीत सिडनीकडून क्विन्सलँडकडे प्रवेश करायचा असेल तर दोन आठवडे क्वारंटीन होणे बंधनकारक आहे.

भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे खेळायला नकार दिल्यास आॕस्ट्रेलियासाठी तो मोठा धक्का असेल कारण ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 1988 पासून आॕस्ट्रेलियन संघाने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत 1-1 अशी बरोबरीत असलेली ही मालिका जिंकण्यासाठी त्यांना ब्रिस्बेनचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमान गील, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांनी शुक्रवारी खरोखरच मेलबोर्नमध्ये नियमांचा भंग केला का, याची चौकशी दोन्ही क्रिकेट मंडळांनी सुरु केली आहे. नियमानुसार खेळाडू व अधिकाऱ्यांना ठरलेल्या हाॕटेलशिवाय इतरत्र खानपान करायचे असेल तर त्यांनी मोकळ्या जागेत बाहेर बसावे असा नियम आहे, ही मंडळी आधी बाहेरच बसलेली होती पण पावसाला सुरुवात झाल्यावर आत रेस्टाॕरंटमध्ये ते बसले होते असा दावा आता करण्यात येत आहे.

भारतीय संघाच्या सुत्रानुसार सिडनीत दाखल होण्यापूर्वी ते दुबईतही 14 दिवस क्वारंटीन होते आणि आॕस्ट्रेलियात दाखल होताच पुन्हा 14 दिवस क्वारंटीनच होते. याप्रकारे जवळपास महिनाभर ते अलग राहिल्यावरच बाहेर येण्यास मोकळे झाले होते. त्यामुळे आता पुन्हा विलगीकरणात जाण्याची त्यांची इच्छा नाही.

नियोजनानुसार भारतीय संघ 4 जानेवारीला सिडनीला रवाना होणार आहे. तेथे दोन दिवस सराव केल्यावर गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना होईल. त्यांनंतर विशेष परवानगीने चार्टर्ड विमानाने ते क्वीन्सलँडमध्ये दाखल होणार आहेत. न्यू साऊथ वेल्समध्ये (सिडनी) कोरोना अद्याप आटोक्यात आलेला नसल्याने क्वीन्सलँडने त्यांच्यासोबतची सीमा बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये हाॕटेल व मैदान एवढीच मोकळीक मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER