भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट; न्यूझीलंड ४६.१ षटकात २११/५

India vs New Zealand

मँचेस्टर (आयसीसी वर्ल्ड कप-२०१९) :- भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान इंग्लंडमध्ये सुरु असलेला विश्वचषकातील पहिला उपान्त्य सामन्यावर पावसाचे सावट असून पावसामुळे थांबला. पाऊस सतत सुरु असल्याने सामना रद्द होऊ शकतो.

मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात न्यूझीलंड फलंदाजी करत असताना ४७ व्या षटकात (४६.१) पावसामुळे खेळ थांबवावा लागला, त्यावेळी किवी पाच बाद २११ धावांवर खेळत होते. रॉस टेलर ६७, तर टॉम लाथम तीन धावांवर खेळत होता.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली. बुमराहने सलामीवीर मार्टिन गप्टिलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडल्यावर विल्यमसन मैदानात उतरला.

रॉस टेलर आणि विल्यमसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. विल्यमसनने ६७ धावा करत एकाच विश्वचषकात न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला.

पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी भारताने सामन्यावर पकड घेतली होती. मात्र पावसामुळे गणितं बिघडून टीम इंडियाच्या दृष्टीने सामना जिंकणे अधिक आव्हानात्मक ठरु शकते.

पाऊस भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजेपर्यंत थांबला नाही, तर भारतासमोर ४६ षटकात २३७ धावा करण्याचे आव्हान असेल. जर भारताचा डाव २० षटकांपर्यंत कमी करण्यात आला, तर टीम इंडियासमोर १४८ धावांचं लक्ष्य असेल. त्यानंतरही पाऊस थांबला नाही, तर आजचा सामना उद्याच्या म्हणजे राखीव दिवसावर ढकलण्यात येईल.

डकवर्थ ल्युईस नियम लागू झाल्यास काय होईल?

४० षटकं- लक्ष्य २२३ धावा
३५ षटकं- लक्ष्य २०९ धावा
३० षटकं- लक्ष्य १९२ धावा
२५ षटकं- लक्ष्य १७२ धावा
२० षटकं- लक्ष्य १४८ धावा

उपान्त्य आणि अंतिम फेरीनंतर राखीव दिवस हा सामन्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी नसतो, तर सामना पुढे सुरु ठेवण्यासाठी असतो. जर राखीव दिवशी पण पावसाचे वर्चस्व राहिले, तर साखळी फेरीत अधिक गुण मिळवणारा संघ (यावेळी भारत) थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

जर अंतिम फेरीतही पावसाने डाव साधला आणि राखीव दिवशीही खेळ होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना विभागून विजेतेपद दिले जाते असा नियम आहे. यामुळे भारत यावेळी विश्वचषक आणेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.