खा. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पोलंडचा स्वातंत्र्यदिन दिल्लीत साजरा

Sambhaji raje

नवी दिल्ली :खा. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या उपस्थितीत पोलंडचा १०२ वा स्वातंत्र्यदिन दिल्लीत साजरा झाला. प्रमुख पाहुणा म्हणून पोलंड देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ( Independence Day of Poland ) कार्यक्रमात सहभागी झाले. दिल्ली येथील पोलंड राजदूतावासात राजदूत अडम बुरकावस्की यांनी यावेळी छत्रपती घराण्याने आणि कोल्हापूरच्या नागरिकांनी केलेल्या मदतीच्या आठवणींना उजाळा दिला.

याबाबत खा. संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे की, दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंड देश पराजित झाला. पोलिश नागरिकांवर अनन्वित अत्याचार होऊ लागले. तेव्हा बऱ्याच नागरिकांना आपला देश सोडून निर्वासित व्हावं लागलं. त्यापैकी काही लोकांना त्यावेळी करवीर छत्रपतींनी राजाश्रय दिला. काही हजार पोलिश नागरिकांचा कोल्हापूरकरांनी खूप पाहुणचार केला होता. निर्वासितांना आश्रय देणाऱ्या घराण्यातील वंशज असल्याकारणाने मला या देशाकडून विशेष सन्मान भेटत असतो. मीसुद्धा त्या भावनिक धाग्याला नेहमी जपण्याचा प्रयत्न करत आलो आहे.

कोल्हापुरात त्या निर्वासित नागरिकांचे विशेष सन्मानाने आतिथ्यसुद्धा काही महिन्यांपूर्वी केले. दुसऱ्या महायुद्धावेळी जी लहान बालके होती किंवा काहींचा जन्म इथल्या कॅम्पमध्ये झालेला होता आणि ते कोल्हापुरात राहिले होते, अशा लोकांना पुन्हा कोल्हापुरात आणून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचा त्या देशाच्या सत्ताधाऱ्यांवर मोठा प्रभाव पडलेला आहे. म्हणूनच कालच्या कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणा म्हणून सन्मान दिला गेला.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जिथं काल कार्यक्रम झाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी या बंगल्याचं वेगळं नातं होतं. याच बंगल्यात डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहायला सुरुवात केली होती. ही बाब भारताचे परराष्ट्र सचिव(पश्चिम) असलेले विकास गौरव यांनी त्यांच्या कालच्या भाषणात सांगितली. हा बंगला आपल्या भावनांशी निगडित असल्याने मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER