Ind vs Aus: रोहितच्या दुखापतीबाबत उद्भवणारे प्रश्न, गांगुलीने दिले हे उत्तर

Sourav Ganguly - Rohit Sharma

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसबाबत सततच्या प्रश्नांनंतर आता BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी रोहितची ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी कोणत्याही संघात निवड झाली नव्हती; परंतु IPL च्या क्वालिफायर व अंतिम सामन्यात उतरल्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले होते.

रोहित शर्माच्या फिटनेसच्या प्रश्नावर सौरव गांगुली म्हणाला की, तुम्ही रोहितला याचे उत्तर का विचारत नाही? फिटनेसमुळे त्याची वनडे आणि टी -२० संघात निवड झाली नाही. खेळाडूंना झालेल्या दुखापतीबद्दल लोकांना माहिती नसते. आम्हाला, टीम फिजिओ आणि NCA ला हे माहीत आहे.

सौरव गांगुली म्हणाला, ‘रोहित सध्या जखमी झाला आहे आणि केवळ ७० टक्के तंदुरुस्त आहे. त्याच्यासारख्या खेळाडूंना आपण वनडे आणि टी -२० संघातून का दूर ठेवू? एकदिवसीय आणि टी -२० मध्ये तो टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याने दुखापतीतून पूर्णपणे बरे व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.’

रोहित शर्माव्यतिरिक्त दुखापतीतून सावरत ईशांत शर्माचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. IPL मध्ये वृद्धिमान साहा हादेखील दुखापतग्रस्त होता, ज्याची कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे. गांगुली म्हणाला, ‘BCCI कसे कार्य करते लोकांना माहिती नाही. वृद्धिमान साहाला हेमस्ट्रिंगची समस्या आहे. लोकांना दुखापत समजत नाही, म्हणून ते काहीही बोलतात.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER