अजिंक्य टीम इंडियाचा ‘हा अनोखा विक्रम’ माहित्येय का?

Ajinkya Rahane

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) दरम्यानची मालिका एवढी रंजक झाली की येणारी कितीतरी वर्षे त्याची चर्चा होत राहिल. या मालिकेत भारतीय खेळाडूंच्या लढाऊ व झुंजार खेळाच्या एकाहून एक स्फुर्तीदायी कथा तर आता समोर येतच आहेत, कसोटीसाठी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) असावा की विराट कोहली ही चर्चा सुरु झाली आहे, संघप्रशिक्षक रवी शास्री यांनी संघाचे कायम राखलेले मनोबल आणि संघात आणलेली सकारात्मकता, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी आपल्या गोलंदाजीला चढवलेली धार याची चर्चा आहे मात्र यासोबतच या मालिकेत आणखी एक गोष्ट अशी घडली जी 21 व्या शतकात प्रथमच घडली, अगदी आकडेमोड करुन सांगायची तर गेल्या 28 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच अशी गोष्ट घडली पण ती फारच कमी लोकांच्या लक्षात आली.

ती गोष्ट म्हणजे 1993 नंतरची ही पहिलीच अशी मालिका होती ज्यात स्थानिक पंचांनी पंचगिरी (Umpires) केली, तरीसुध्दा पाहुण्या संघाने म्हणजे भारताने ही मालिका जिंकली. याआधीची अशी शेवटची मालिका होती 1993 ची अॕशेस मालिका ज्यात इंग्लंडचेच पंच होते आणि ती मालिका ऑस्ट्रेलियाने 4-1 अशी जिंकली होती. आता आपण ऑस्ट्रेलियातील मालिका 2-1 अशी जिंकली.

कोरोनामुळे प्रवासावर बंधने असल्याने आणि परदेशातून आल्यावर क्वारंटीनचे बंधनं असल्याने या मालिकेत ब्रुस ऑक्सेनफोर्ड (Bruce Oxenford) , पॉल विल्सन (Paul Wilson) , पॉल रायफेल (Paul Reiffel) , क्लेयर पोलोसाक, जेरार्ड अबूड, राॕड टकर हे सर्व पंच ऑस्ट्रेलियाचेच होते. यामुळे 1993 नंतर पहिल्यांदाच क्रिकेट मालिका स्थानिक पंचांसह खेळल्या जात आहेत.

कोरोनाची साथ पसरल्यावर मार्च 2020 पासूनच्या मालिका जर आपण पाहिल्या तर भारत वगळता यजमान संघांनीच मालिका जिंकल्या आहेत. इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुध्दची, न्यूझीलंडने वेस्ट इंडीजविरुध्दची, न्यूझीलंडनेच पाकिस्तानविरुध्दची, दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुध्दची, इंग्लंडने पाकिस्तानविरुध्दची मालिका आपल्या घरच्या मैदानांवरच आणि कोरोनामुळे अर्थात स्थानिक पंचांच्या देखरेखीतच जिंकल्या आहेत पण भारतीय संघ हा एकमेव असा संघ ठरलाय ज्याने स्थानीक पंच असले तरी परदेशात जाऊन मालिका जिंकायचा पराक्रम गाजवलाय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास ज्यांना ठाऊक आहे त्यांना माहित आहे की 7 नोव्हेंबर 1986 रोजी पंचगिरीबाबत इतिहास घडला. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या लाहोर कसोटीत भारताचे व्ही. के. रामास्वामी व पिलू रिपोर्टर हे पहिले तटस्थ पंच ठरले. इम्रान खानने हा धाडसी बदल केला होता. त्यानंतर त्याने 1989-90 च्या भारताविरुध्दच्या मालिकेतही इंग्लंडचे जॉन हॕम्पशायर व जॉन होल्डर हे तटस्थ पंच नेमले होते.

यामुळे पंचगिरीबद्दल पक्षपाताच्या तक्रारी कमी झाल्याचे दिसून आल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 1992 पासून एक तटस्थ पंच (neutral umpire) नेमण्याची पध्दत प्रायोगिक स्तरावर सुरु झाली. दोन वर्षांनी याला अधिकृत मान्यता देण्यात आली आणि 2002 च्या भारत- वेस्ट इंडीज मालिकेपासून दोन्ही पंच तटस्थ देशांचे नेमले जाऊ लागले.

त्यामुळे क्रिकेट जगतात खेळाडूंपेक्षाही पंच हे अधिक व्यस्त प्रवासी ठरले पण गंमत म्हणजे तटस्थ पंच नेमले गेल्यापासून उलट घरच्या मैदानांवर यजमान संघाने सामने जिंकण्याचे प्रमाण तुलनेत वाढलेले दिसले.

याप्रकारे 1994 पासून सातत्याने किमान एका तरी तटस्थ पंचाच्या देखरेखीत आंतरराष्ट्रीय सामने होत असले तरी आता कोरोनामुळे मात्र पुन्हा स्थानिकच पंच नेमायची वेळ आली आणि त्यांच्या देखरेखीत क्रिकेट इतिहासातील सर्वात रंगतदार मालिकांपैकी एक असलेली भारत – आॕस्ट्रेलियादरम्यानची मालिका पंचगिरीबाबतच्या कोणत्याही मोठ्या विवादांशिवाय पार पडली.

विशेष म्हणजे मालिकेचा फैसला ज्या ब्रिस्बेन कसोटीतील भारताच्या विजयाने झाले त्यात तर दोन्ही पंचाचा कोणताही निर्णय डीआरएस प्रणालीने चुकीचा ठरवला नाही. सामन्यादरम्यान काही वेळा रिमझीम पाऊस झाला तेंव्हासुध्दा पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड व पाॕल विल्सन यांनी खेळ थांबवला नाही परिणामी हा सामना पूर्ण झाला अन्यथा कदाचित सामन्याच्या निकालावर परिणाम झाला असता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER