संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार ; प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

Sanjay raut-kangana Ranaut

मुंबई : काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)आणि शिवसेनेत मोठे वादंग निर्माण झाले आहेत. यापार्श्वभूमीवर पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात (HC) याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने कंगनाला मंगळवारी दिली, तसेच पालिकेच्या एच/पश्चिम प्रभागाचे अधिकारी भगवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्याची मुभा दिली. यामुळे संजय राऊत (Sanjay raut) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसते .

मुंबई महापालिकेने (BMC) केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. त्यामुळे पालिकेला व संबंधित अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कंगनाने याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती. कंगनातर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात एक डीव्हीडी सादर केली. त्यात खासदार संजय राऊत यांचे एक भाषण रेकॉर्ड केलेले आहे. त्या भाषणात राऊत यांनी कंगनाला धमकी दिल्याचा दावा वकिलांनी केला.

या डीव्हीडीचा आधार घेऊन अर्जदार युक्तिवाद करणार असेल, तर याचिकेमध्ये संजय राऊत यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक आहे. कारण त्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

ही बातमी पण वाचा :  अनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊतांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER