आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ व्हावी : चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant patil
  • अवकाळीपवसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारची मर्यादा वाढवावी
  • महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची तातडीने पुनर्बांधणी करावी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ व्हावी, तसेच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयाची मर्यादा देखील वाढवी आणि सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची शासनाच्या वतीने तातडीने पुनर्बांधणीच्या कामास तातडीने सुरुवात करावी, आदी मागण्या भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर श्री पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले की, गेल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने नानाजी देशमुख यांच्या नावाने एक योजना सुरु करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर यवतमाळ, उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये गावामध्ये एक समिती तयार करुन, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या योजना आजही सुरु असल्या, तरी त्यावरील निधीची तरतूद वाढवली पाहिजे. मात्र दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सध्या एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. याद्वारे त्या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह चालवणे शक्य नाही. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी. तसेच, अपाघातामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबियांना आपण चार लाखाची नुकसानभरपाई देतो, त्यामध्येही वाढ करण्यात यावी, आणि यामध्ये विम्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी श्री पाटील यांनी केली.

त्याचबरोबर यंदा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना शासनाच्या वतीने हेक्टरी आठ हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, जी मागणी करण्यात येत होती, त्यानुसार हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ही मागणी श्री पाटील यांनी यावेळी केली.

तसेच, यंदा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा फटका बसला. यात अनेक घरांची पडझड झाली. ही घरं बांधून देण्याच्यादृष्टीने कोणतीही हालचाल सुरु झालेली नाही. काही खासगी स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर व्यक्तींनी पुढाकार घेऊन काही प्रमाणात तात्पुरत्या स्वरुपातील घरे उभारुन दिली आहेत. मात्र, यासाठी निधीची उपलब्धता असूनही, अनेक कारणांनी शासनाकडून घरांची पुनर्बांधणी केली जात नाही आहे. त्यामुळे यावर जलदगतीने कार्यवाही व्हावी अशी ही मागणी श्री. पाटील यांनी यावेळी केली.

आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढव करण्यात यावी, अवकाळी पवसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारची मर्यादा वाढवावी, महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची तातडीने पुनर्बांधणी करावी आदी मागण्या केल्या.