कोरोनाच्या चाचण्या वाढवा; फडणवीस यांची मागणी

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

पुणे : दिल्लीत कोरोनाच्या १८ हजार चाचण्या होतात. मात्र, महाराष्ट्रात ३६ हजार चाचणींची क्षमता असताना फक्त १४ हजार चाचण्या होतात. मुंबईत १० हजारांची क्षमता असताना ४ हजार चाचण्या केल्या जातात. पुण्याची चाचणींची क्षमता फार कमी आहे, हे घातक आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत मोठ्या संख्येत चाचण्या करून संशयित रुग्णांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडावे किंवा त्यांना घरी विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनेटेड बेड्स या गोष्टी मोठ्या संख्येत वाढवण्याची आवश्यकता आहे. पण, अद्यापही पुण्यासारख्या शहरात चाचणीची संख्या वाढवली जात नाही. मला असं वाटते की, काही प्रमाणात सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पुण्यात चाचणीची व्यवस्था वाढवावी, अशी विनंती मी सरकारकडे करणार आहे’, असे त्यांनी सांगितले.

रेट ऑफ इन्फेक्शनचा विचार करा

‘पुण्याचा रेट ऑफ इन्फेक्शन बारा ते साडेबारा टक्के होता. गेल्या दोन ते तीन दिवसात तो १८ टक्क्यांवर पोहोचला. सात ते आठ टक्क्यांनंतर चाचण्यांची संख्या दुप्पट केली पाहिजे तरच वाढलेले रुग्ण लक्षात येतात. त्यातून होणारा संसर्ग टाळता येतो. ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण किती आढळत आहेत त्यापेक्षा ‘रेट ऑफ इन्फेक्शन’चा विचार केला पाहिजे. किती लोकांचा मृत्यू वाचवू शकतो, हे पाहिले पाहिजे. चाचण्यांची संख्या वाढवूनच आपण हे करू शकू, असे फडणवीस म्हणाले.

‘राज्यात येऊन गेलेल्या केंद्राच्या आरोग्य पथकाने चाचण्या वाढवण्याची सूचना केली होती. याशिवाय जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे नियोजन करण्याकरता अधिकचे आयसीयू बेड्स, ऑक्सिजनेटेड बेड्स आणि काही प्रमाणात व्हेंटिलेटर्स याचा विचार करण्याची आवश्यकता आहे’, असे ते म्हणाले.

‘प्रशासन चांगले काम करते आहे. प्रशासन उपलब्ध संसाधनांच्या आधारे प्रयत्न करत आहे. ‘डॅशबोर्ड’ चांगले आहेत. पण खासगी रुग्णालयांशी योग्य समन्वयदिसत नाही. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी जो जीआर काढला आहे, त्यात ८० टक्के बेड्स सांगितले आहेत. पण ते बेड्स मिळतात की नाही, हे तपासण्याची व्यवस्था नाही, असं फडणवीस यांनी सांगितले.

‘खासगी रुग्णालयातील आयसीयू बेड्सपैकी किती बेड्स मिळणार आहेत? व्हेंटिलेटर मिळणार की नाही? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. राज्य सरकारने बिलासंदर्भात जे रेट्स ठरवून दिले आहेत त्यात सुधारणा करावी. खासगी रुग्णालयात आयसीयूचा रेट ९ हजार ठरवला असेल तर ते पैसे बिलात जोडले जातात. त्यासोबत पीपीई किट्स किंवा इतर चार्जेसही बिलामध्ये लावले जातात. म्हणून सरकारने जीआरमध्ये सुधारणा करुन कशाबाबत किती पैसे घेतले पाहिजे? याबाबत नियम केले पाहिजेत’, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर

‘सकाळी पहिल्यांदा पिंपरी-चिंचवडचा गेलो. त्यानंतर आम्ही पुण्याचा दौरा केला. उद्या मी सोलापूरचा दौरा करणार आहे. टप्याटप्याने इतरही ठिकाणी जिथे जास्त रुग्ण आहे, अशा ठिकाणी जाणार आहे, याशिवाय आमचे पदाधिकारीदेखील जाणार आहेत. आमचे केंद्रीय मंत्रीदेखील जाणार आहेत’, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER