राष्ट्रवादीत पुन्हा इनकमिंग; असंख्य समर्थकांसह नवी मुंबईतील काँग्रेस नेत्याचा प्रवेश

NCP - Maharashtra Today

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्य सरकारमध्ये एकत्र असले तरी, मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढण्यावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे. तिन्ही पक्ष एकमेकांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेताना दिसून येत आहे. अशातच  राष्ट्रवादी काँग्रेसने आज काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

नवी मुंबईतील काँग्रेसचे नेते नामदेव भगत (Namdev Bhagat) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

जयंत पाटील म्हणाले की, गणेश नाईक जरी पक्ष सोडून गेले तरी आदरणीय पवारसाहेबांवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत. नामदेव भगत यांच्या येण्याने नवी मुंबईत पक्षाला उभारी येईल. अनेक लोक आज राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत; मात्र कोरोनामुळे थांबले आहेत. पण येत्या काळात राष्ट्रवादी हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष असेल. राष्ट्रवादीत प्रेम, जिव्हाळा, विचार आहे आणि प्रत्येकाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे नामदेव  भगत योग्य ठिकाणी आले आहेत, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा छोटेखानी स्वरूपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय पवारसाहेब यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहोत. त्यामुळे अनेक जण प्रभावित होऊन राष्ट्रवादीत येऊ इच्छितात, या भावनेतूनच नामदेव भगत यांनी पक्षात प्रवेश केला. गणेश नाईक यांना नवी मुंबई आंदण दिल्यासारखे होते; पण ते भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले. ते जरी भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत आजही आहेत. भगत यांनी सामाजिक, राजकीय जीवनात प्रचंड काम केले आहे. लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे नामदेव भगत यांच्या रूपाने एक खंदा कार्यकर्ता पक्षाला लाभला असल्याचे अजितदादांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची विचारपूस केली जाते, त्यांचा सन्मान ठेवला जातो म्हणून पक्षात प्रवेश केला. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पूर्ण करेन, असा विश्वास नामदेव भगत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आ. अनिल गोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button